राहुल गांधी संसदेत बोलले; पहिल्याच भाषणात म्हणाले.. 

वृत्तसंस्था
गुरुवार, 11 जुलै 2019

'शेतकऱ्यांना वसुलीच्या नोटीस बजावत त्यांना बॅंकांनी हैराण करू नये', अशी मागणीही राहुल यांनी केली. यासंदर्भात रिझर्व्ह बॅंकेला योग्य त्या सूचना करण्याचीही मागणी त्यांनी केली. 

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (गुरुवार) प्रथमच केलेल्या भाषणामध्ये शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित केला. 'देशातील शेतकरी हलाखीच्या स्थितीत आहेत, याकडे मी सरकारचे लक्ष वेधू इच्छितो. मोदींनी शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पाळावीत.', असे राहुल म्हणाले. 

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राहुल गांधी यांनी जाहीर भाष्य करणे टाळले होते. त्या पार्श्‍वभूमीवर राहुल यांनी आज लोकसभेमध्ये भाषण केले. अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी पुरेशी तरतूद नसल्याची टीका राहुल यांनी केली. 'शेतकऱ्यांची दुरावस्था रोखण्यासाठी केंद्र सरकारने अर्थसंकल्पामध्ये कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत', असे राहुल म्हणाले. 

'शेतकऱ्यांना वसुलीच्या नोटीस बजावत त्यांना बॅंकांनी हैराण करू नये', अशी मागणीही राहुल यांनी केली. यासंदर्भात रिझर्व्ह बॅंकेला योग्य त्या सूचना करण्याचीही मागणी त्यांनी केली. 

तत्पूर्वी कर्नाटकमधील राजकीय परिस्थितीसाठी भाजपला जबाबदार धरत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसह राहुल यांनी संसदेच्या बाहेर निदर्शने केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahul Gandhi talked about farmers situation in India at Parliament