'सुपर पीएम' संसदेत येत नाहीत : राहुल गांधी

वृत्तसंस्था
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

'काळ्या पैशावर जालीम तोडगा आवश्‍यक होता. यामुळे नागरिकांना काही दिवस नक्कीच त्रास होणार आहे. पण देशाच्या दीर्घकालीन हिताचा विचार करता हे पाऊल आवश्‍यकच होते. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे,' असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी गेल्या पंधरवड्यात वारंवार केले आहे.

नवी दिल्ली: 'देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारा सर्वांत मोठा निर्णय घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुणाशीही चर्चा केली नाही. मोजके तीन-चार जण सोडले, तर याविषयी कुणालाच ठाऊक नव्हते,' अशी टीका कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (सोमवार) केली. नोटाबंदीच्या निर्णयावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज गदारोळ झाला. लोकसभेचे कामकाज तहकूब झाल्यानंतर राहुल गांधी यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद साधला.

दिल्लीमधील एटीएमच्या बाहेरील रांगांमध्ये उभ्या असलेल्या नागरिकांची राहुल गांधी यांनी आज सकाळी भेट घेतली. नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर एटीएम आणि बॅंकांबाहेरील गर्दीशी संवाद साधण्याची ही राहुल यांची तिसरी वेळ होती. 'घाईत आणि अजिबात नियोजन न करता घेतलेल्या या निर्णयामुळे नागरिकांचे हालच होत आहेत,' अशी प्रतिक्रिया राहुल यांनी व्यक्त केली.

नोटाबंदीच्या निर्णयावरून संसदेत कॉंग्रेसने सत्ताधारी भाजपला घेरण्याची व्यूहरचना आखली आहे. राहुल गांधी यांनीही याविषयावरून पंतप्रधान मोदी यांनाच लक्ष्य केले आहे. "मोदींना आता काय म्हणायचे, तेच कळत नाही! कदाचित, ते 'सुपर प्राईम मिनिस्टर' असावेत.. ते आपल्या सगळ्यांपेक्षा वेगळ्याच पातळीवर आहेत. मग पंतप्रधानांनी संसदेत येण्याची गरजच काय!' अशी उपहासात्मक टीकाही त्यांनी केली.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशभरातील गोंधळाची स्थिती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच संसदेला उत्तर द्यावे, अशी मागणी कॉंग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी केली आहे. मात्र, मोदी संसदेच्या दोन्ही सभागृहांत अनुपस्थितच आहेत. 'पंतप्रधानांच्या अनुपस्थितीचा मुद्दा उचलणाऱ्या विरोधी पक्षांना चर्चेत रसच नाही,' अशी टीका अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली आहे.

Web Title: Rahul Gandhi targets PM Narendra Modi over Demonetisation