esakal | 'इव्हेंटबाजी थांबवा, गरजूंना लस द्या'; राहुल गांधी यांचे पंतप्रधान मोदी यांना आवाहन

बोलून बातमी शोधा

rahul gandhi narendra modi

देशात सोमवारी एक लाख ६८ हजार ९१२ रुग्ण आणि ९०४ मृत्यू अशी आतापर्यंतची सर्वाधिक नोंद झाली.

'इव्हेंटबाजी थांबवा, गरजूंना लस द्या'; राहुल गांधी यांचे पंतप्रधान मोदी यांना आवाहन
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इव्हेंटबाजी थांबवावी, असा टोला लगावून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी प्रत्येक गरजू नागरिकाला कोरोनावरील लस द्यावी, असे आवाहन केले. राहुल यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला. लस महोत्सवाच्या संदर्भात त्यांनी शेरा मारताना म्हटले आहे की, तुम्ही घंटानाद करून घेतला, थाळ्या वाजवून घेतल्या, मोबाईल फोनची बॅटरी प्रज्वलित करून घेतली. कोरोना मात्र पसरत राहिला. आता देशात तीव्र स्वरूपाची दुसरी लाट पसरली आहे आणि लाखो लोक या रोगाला बळी पडत आहेत. त्यामुळे महोत्सवी उपक्रमांकडे असलेला कल थांबवा. लशीची निर्यात थांबवा आणि ती गरजूंना द्या.

देशात सोमवारी एक लाख ६८ हजार ९१२ रुग्ण आणि ९०४ मृत्यू अशी आतापर्यंतची सर्वाधिक नोंद झाली. मोदी यांनी लस महोत्सवाचे आवाहन केले असले तरी महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, ओडीशा, अशा अनेक राज्यांत असंख्य लसीकरण केंद्र बंद करणे भाग पडले आहे.

हेही वाचा - मोठी बातमी! देशात रशियाच्या 'स्पुटनिक' लशीला परवानगी
४५ वर्षांवरील व्यक्तींपूरतीच लस मर्यादित न ठेवता सर्व वयोगटांसाठी खुली व्हावी यावरून जोरदार चर्चा सुरु आहे. चार राज्यांमधील निवडणूका आणि सण तसेच उत्सवांमुळे संसर्ग वाढतच चालला आहे. जमावाकडून कोरोना निर्बंधांचे पालन केले जात नसल्यामुळे दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. सध्याच्या प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी गरिबांना आर्थिक मदत मिळायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली.

१८ दिवसांत जिंकू....
मोदी यांनी कोरोनाच्या जागतिक साथीविरुद्ध १८ दिवसांत जिंकण्याची गर्जना केली होती, असे राहुल यांनी निदर्शनास आणून दिले. ते म्हणाले की, आता ३८५ दिवस उलटून गेले तरी ही लढाई जिंकता आलेली नाही.