सुरक्षा व्यवस्था नाकारुन राहुल गांधी काय लपवित आहेत?: राजनाथ

वृत्तसंस्था
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

गेल्या दोन वर्षांत राहुल हे 72 दिवस परदेशांत होते. यावेळी त्यांनी एसपीजी व्यवस्था नाकारली. एसपीजी कायद्याचा हा भंग आहेच; शिवाय एसपीजी व्यवस्था नाकारुन परदेशांत जाताना राहुल हे काय लपवित होते?

नवी दिल्ली - कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर गुजरातमध्ये झालेल्या दगडफेकीचे आज (मंगळवार) संसदेमध्ये तप्त पडसाद उमटले. विरोधकांच्या टीकेस उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राहुल यांनी सुरक्षा नियमावलीचे (सिक्‍युरिटी प्रोटोकॉल) पालन केले नसल्याचे स्पष्ट केले. याचबरोबर, राहुल यांनी गेल्या दोन वर्षांत केलेल्या सहा परदेश दौऱ्यांवेळी विशेष सुरक्षा पथकाची (एसपीजी) सुरक्षा नाकारली असल्याचे सांगत गृहमंत्र्यांनी राहुल यांना लक्ष्य केले. एसपीजी व्यवस्था नाकारत राहुल हे काय लपविण्याचा प्रयत्न करत होते, अशी उपहासात्मक विचारणाही सिंह यांनी यावेळी केली.

"गेल्या दोन वर्षांत राहुल हे 72 दिवस परदेशांत होते. यावेळी त्यांनी एसपीजी व्यवस्था नाकारली. एसपीजी कायद्याचा हा भंग आहेच; शिवाय एसपीजी व्यवस्था नाकारुन परदेशांत जाताना राहुल हे काय लपवित होते? कायद्याच्या भंगाबरोबरच राहुल यांनी सुरक्षेकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे,'' असा हल्ला सिंह यांनी यावेळी चढविला.

""गुजरात दौऱ्यावेळीही राहुल यांनी तेथील पोलिस दल वा एसपीजी अधिकाऱ्यांकडे दुर्लक्ष करत केवळ त्यांच्या वैयक्तिक सचिवांचेच ऐकले. पोलिसांनी दिलेल्या वाहनामध्ये न बसता त्यांनी बुलेटप्रूफ नसलेल्या वाहनाने जाण्याचा निर्णय घेतला. राहुल यांच्यावर दगडफेक झाल्याप्रकरणी गुजरात सरकार चौकशी करत आहे; व या प्रकरणी एकास अटकही करण्यात आली आहे. परंतु राहुल यांनी सुरक्षा नियमावलीचे पालन करावयास हवे होते,'' असे सिंह यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडूनच ही दगडफेक करण्यात आल्याचा आरोप राहुल यांनी केला आहे. 

Web Title: Rahul Gandhi went abroad without security, says Rajnath Singh