मोदींनी चीनच्या घुसखोरीबाबत दिशाभूल केल्याचं उघड; राहुल गांधींची सरकारवर टीका

PM Modi and Rahul Gandhi Sakal.jpg
PM Modi and Rahul Gandhi Sakal.jpg

कोरोनाजन्य परिस्थिती मध्ये काल सोमवारपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले. या अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत भारत आणि चीन यांच्यातील सीमावादावरून चाललेल्या तणावाच्या मुद्यावर स्पष्टीकरण दिले. त्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिलेल्या माहितीनंतर राहुल गांधी यांनी सोशल मीडियाच्या ट्विटर वरून मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. 

चीनच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला धारेवर धरताना राहुल गांधींनी आपल्या ट्विटमध्ये , चीनच्या घुसखोरीवरून मोदींनी देशाची दिशाभूल केल्याचे संरक्षणमंत्र्यांच्या विधानावरून स्पष्ट होत असल्याचे म्हटले आहे. तसेच संपूर्ण देश नेहमीच भारतीय सैन्यासह उभा होता, आहे आणि राहणार असल्याचे म्हणत, तुम्ही कधी चीनच्या विरोधात उभे राहणार असल्याचा सवाल देखील राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला आहे. याव्यतिरिक्त चीनने बळकावलेली भूमी परत कधी घेणार, असा प्रश्न देखील विचारून चीनचे नाव घेण्यास घाबरू नका असा टोला देखील राहुल गांधींनी मोदींना लगावला आहे. 

आज देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत लडाख प्रकरणाबाबत चीनसोबत सुरु असलेल्या सीमेवरील तणावाबाबत सविस्तर निवेदन दिले. या निवेदनात चीनने भारताचा अडतीस हजार चौरस किलोमीटर भूभाग अनधिकृतरित्या ताब्यात घेतले असल्याची कबुली राजनाथ सिंह यांनी दिली. याव्यतिरिक्त चीनने एप्रिलपासून पूर्व लडाखच्या सीमेवर मोठ्या प्रमाणावर सैन्याची जमवाजमव आणि युद्ध सामग्री वाढवली असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले. तर मे महिन्याच्या सुरुवातीच्या काळात चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने गलवान खोऱ्यात भारतीय सैन्याच्या पेट्रोलिंग मध्ये अडथळा आणण्यास सुरवात केली. आणि त्यामुळेच संघर्षाची स्थिती उदभवल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, 15 जून रोजी भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झडप झाली होती. यात भारताचे 20 जवान शहीद झाले होते. चीनचीही हानी झाली होती, मात्र याबाबतची माहिती देण्यात आली नाही. या पार्श्वभूमीवर गेल्या चार महिन्यांपासून उभय देशांमध्ये प्रचंड तणाव आहे. दोन्ही देशांनी सीमा भागात मोठा फौजफाटा तैनात केलाय. चीनने या काळात दोनदा 'जैसे थे' परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे वातावरण आणखी तापले आहे. यात भारताने दक्षिण पेंगॉंग तलावाच्या परिसरात ताबा मिळवला असल्याने, चीनचा तिळपापड झाला आहे. दोन्ही देशांमध्ये लष्करी आणि मुत्सद्दी स्तरावर चर्चा सुरु आहे. पण, याला यश येताना दिसत नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com