प्रतीक्षा यादीतल्यांना रेल्वेचा दिलासा

वृत्तसंस्था
बुधवार, 18 जानेवारी 2017

नवी दिल्ली : रेल्वेच्या प्रतीक्षा यादीत ताटकळणाऱ्या लहान स्थानकांवरच्या प्रवाशांना आता दिलासा मिळणार आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांना फक्त निवडक स्थानकांवरच उपलब्ध असलेला "डिस्टन्स रजिस्ट्रेशन'ची अट असलेला "पुल्ड कोटा' खुला करून सर्व प्रवाशांनाच सर्वसाधारण प्रतीक्षा कोटा लागू करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे.

नवी दिल्ली : रेल्वेच्या प्रतीक्षा यादीत ताटकळणाऱ्या लहान स्थानकांवरच्या प्रवाशांना आता दिलासा मिळणार आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांना फक्त निवडक स्थानकांवरच उपलब्ध असलेला "डिस्टन्स रजिस्ट्रेशन'ची अट असलेला "पुल्ड कोटा' खुला करून सर्व प्रवाशांनाच सर्वसाधारण प्रतीक्षा कोटा लागू करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे.

निर्धारित अंतराऐवजी संबंधित रेल्वेगाडीच्या पूर्ण अंतरासाठी एकच कोटा लागू करून "डिस्टन्स रजिस्ट्रेशन'ची प्रथा संपुष्टात आल्याने तिकीट कन्फर्म होणे सुलभ होणार आहे. रेल्वे मंडळाचे प्रवासी विपणन संचालक विक्रमसिंह यांनी विभागीय व्यवस्थापकांना याबाबतचा आदेश दिला आहे. यानुसार रेल्वेच्या देशातील संगणकीय प्रणालीतही बदल केले जातील व नंतर ही यंत्रणा लागू होईल.

"डिस्टन्स रजिस्ट्रेशन' प्रणालीत तुलनेने छोट्या स्थानकांना वेगळा कोटा नसतो. त्यांच्यावरील तिकिटे "पुल्ड कोट्या'तून दिली जातात. म्हणजेच ती तिकिटे कन्फर्म व्हायची असतील, तर त्याच कोट्यातील अन्य तिकिटे रद्द व्हावी लागतात. उदा. हजरत निजामुद्दीन-एर्नाकुलम मंगला एक्‍स्प्रेसला (12617-12618) 2761 किलोमीटर अंतरापैकी निवडक स्थानकांवरच कोटा असतो. म्हणजे हजरत निजामुद्दीन स्थानकानंतर थेट भोपाळ स्थानकावरच मुख्य कोट्यातून (डिस्टन्स रजिस्ट्रेशन) तिकिटे जारी होतात. या दरम्यान आग्रा, झाशी व ग्वाल्हेर या स्थानकांना असा कोटा नाही. त्यामुळे तेथून चढणाऱ्या प्रवाशांना एखादे तिकीट कन्फर्म होण्यासाठीही यातायात करावी लागत असे. कारण तेथे कोटाच नाही. आता तिकिटे आरक्षित करतानाच प्रतीक्षा यादी सर्वसाधारण ठेवली जाणार असल्याने निर्धारित अंतराऐवजी पूर्ण देशातील रेल्वेमार्गांसाठी ताजा आदेश लागू राहील, असेही रेल्वेने स्पष्ट केले आहे. हा आदेश प्रत्यक्षात येण्यासाठी रेल्वेच्या सॉफ्टवेअरमध्ये मोठे फेरबदल करावे लागणार आहेत. त्यासाठी मार्च महिनाही उजाडू शकतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

"डिस्टन्स रजिस्ट्रेशन' प्रणाली
सध्या लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांचा आरक्षण कोटा प्रवासाच्या अंतरावर ठरविला जातो. "डिस्टन्स रजिस्ट्रेशन' प्रणालीत तुलनेने छोट्या स्थानकांना वेगळा कोटा नसतो. त्यांच्यावरील तिकिटे "पुल्ड कोट्या'तून दिली जातात. म्हणजेच ती तिकिटे कन्फर्म व्हायची असतील, तर त्याच कोट्यातील अन्य तिकिटे रद्द व्हावी लागतात.

Web Title: railway gives relief to waiting list