रेल्वे पोलिसांनी केली 26 अल्पवयीन मुलींची सुटका

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 7 जुलै 2018

मुझफ्फरनगर- बांद्रा अवध एक्‍स्प्रेसमधून रेल्वे पोलिस आणि राज्य रेल्वे पोलिसांनी 26 अल्पवयीन मुलींची सुटका केली. या संदर्भात प्रवाशांनी ट्विट करून माहिती दिल्याने त्यांची सुटका करण्यात पोलिसांना यश मिळाले.

नवी दिल्ली : मुझफ्फरनगर- बांद्रा अवध एक्‍स्प्रेसमधून रेल्वे पोलिस आणि राज्य रेल्वे पोलिसांनी 26 अल्पवयीन मुलींची सुटका केली. या संदर्भात प्रवाशांनी ट्विट करून माहिती दिल्याने त्यांची सुटका करण्यात पोलिसांना यश मिळाले. काल या संदर्भात एका प्रवाशाने ट्विट करून माहिती दिली होती. त्यात म्हटले होते, की एस 5 डब्यातील 25 मुली रडत असून, त्या असुरक्षित असल्याचे वाटत आहे, असे रेल्वेच्या प्रवक्‍त्याने सांगितले. 

या ट्विटला वाराणसीच्या आणि लखनौच्या पोलिसांनी त्वरित प्रतिसाद देत चौकशी सुरू केली, असेही या प्रवक्‍त्याने सांगितले. गोरखपूरच्या राज्य रेल्वे पोलिसांनी मुलांची तस्करी रोखणाऱ्या पोलिस दलाशी संपर्क साधला. त्यानंतर साध्या वेशातील दोन रेल्वे पोलिस कापडगंज येथे रेल्वेत चढले आणि त्यांना गोरखपूर येथे घेऊन गेले. या 26 मुलींबरोबर दोन साधारण 22 वर्षे आणि 55 वर्षे वयाचे पुरुष होते. ते दोघे बिहारच्या पश्‍चिम चंपारण्य भागातील होते. या मुलींना ते नरकटीयागंज येथून इदगाहला नेत होते. सुटका करण्यात आलेल्या मुली या दहा ते 14 वयोगटातील आहेत.  

Web Title: Railway police Release 26 minor girls