हुडहुडणाऱ्या दिल्लीला पावसाचाही मार !

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 9 जानेवारी 2020

आंदोलनाची धग कायम
अवकाळी पाऊस व थंडीतही शाहीन बाग व जेएनयूसह विविध महाविद्यालयांत सरकारी दडपशाहीच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांचा उत्साह कायम होता. पोलिस छावणीचे स्वरूप आलेल्या जेएनयू व परिसरात पावसाच्या सरींबरोबर विद्यार्थ्यांनी क्रांतिकारी गीतांवर ताल धरला. जुलमी राजवटीच्या विरोधात असलेली व ‘सब ताज उखाडे जाऐंगे, सब तख्त गिराए जाऐंगे’ असा दुर्दम्य आशावाद प्रकट करणारी फैज यांची ‘हम देखेंगे’ ही कविता तरुणाईत यंदा विशेष आकर्षण ठरली आहे.

नवी दिल्ली - शतकातील विक्रमी थंडी झेलणाऱ्या दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात (एनसीआर) आज सकाळपासून अवकाळी पावसाने जोर पकडला. सकाळी साडेआठ ते दहा या वेळात जोरदार पाऊस झाल्याने सरकारी बाबू व कार्यालयात निघालेल्या चाकरमान्यांचे हाल झाले. दुपारनंतरही पावसाचा अधूनमधून शिडकावा होत राहिला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यामुळे दिल्लीतील जीवघेण्या प्रदूषणात किंचित घट झाली असली तरी पावसामुळे ९ ते १२ जानेवारी व त्यापुढेही थंडीची जोरदार लाट पुन्हा येईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. पावसापाठोपाठ सकाळी अकराच्या सुमारास दिल्लीत भूकंपाचे हलके धक्केही जाणवले. 

राष्ट्रपतींनी सोडवली नवधूची अडचण...

दिल्लीकरांना यंदा डिसेंबरमधील थंडीने कापरे भरवले. २० ते ३१ डिसेंबरदरम्यान गेल्या ११९ वर्षांतील विक्रम ओलांडून पारा सलग सात दिवस २ ते ४ अंशांच्या दरम्यान राहिला व दिल्ली गोठल्याची परिस्थिती निर्माण झाली. मध्यंतरी दोन चार दिवस स्वच्छ ऊन पडले. पण काल व आज सकाळी पावसाने दिल्लीकरांना भिजवून टाकले. यामुळे प्रदूषणाची पातळी किंचित घटली, मात्र अजूनही राजधानीच्या हवेचा गुणवत्ता स्तर ३०० च्या वर म्हणजे श्‍वसनाच्या दृष्टीने खराब या श्रेणीतच आहे. मात्र या पावसाचा परिणाम म्हणजे जीवघेण्या थंडीचे पुनरागमन असा हवामान विभागाचा अंदाज असल्याने लोकांना कापरे भरले आहे. विभागीय हवामान यंत्रणेचे उपसंचालक डॉ. कुलदीप श्रीवास्तव यांच्या म्हणण्यानुसार, उद्यापासून म्हणजे ९ जानेवारीपासून दाट धुक्‍यासह थंडीची तीव्र लाट पुन्हा येईल, असा अंदाज आहे. या दरम्यान तापमान पुन्हा खाली जाईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rain in delhi