उत्तर भारतात "आँधी तुफान'  शंभरहून अधिक मृत्युमुखी; दीडशे जखमी 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 4 मे 2018

जयपूर/ लखनौ - राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये बुधवारी रात्री आलेल्या धुळीच्या वादळामुळे हाहाकार उडाला आहे. गेल्या चोवीस तासांत चार राज्यांत वादळ आणि पावसामुळे सुमारे शंभरहून अधिक मृत्युमुखी पडले आहेत. त्यात उत्तर प्रदेशच्या 64 जणांचा, तर राजस्थानच्या 36 जणांचा समावेश आहे. मध्य प्रदेश आणि बिहारमध्ये एकूण चार जण मृत्युमुखी पडले. या वादळात 147 हून अधिक जखमी झाले आहेत. 

जयपूर/ लखनौ - राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये बुधवारी रात्री आलेल्या धुळीच्या वादळामुळे हाहाकार उडाला आहे. गेल्या चोवीस तासांत चार राज्यांत वादळ आणि पावसामुळे सुमारे शंभरहून अधिक मृत्युमुखी पडले आहेत. त्यात उत्तर प्रदेशच्या 64 जणांचा, तर राजस्थानच्या 36 जणांचा समावेश आहे. मध्य प्रदेश आणि बिहारमध्ये एकूण चार जण मृत्युमुखी पडले. या वादळात 147 हून अधिक जखमी झाले आहेत. 

धुळीच्या वादळाचा सर्वाधिक फटका उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्याला बसला असून, तेथे 43 जण मृत्युमुखी पडले असून, 35 जण जखमी झाले आहेत. वादळाचा वेग हा ताशी 120 किलोमीटरपेक्षा अधिक होता. यादरम्यान रस्त्यावरची झाडे, विजेचे खांब कोसळले. अनेक ठिकाणी रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक ठप्प झाली, तसेच रेल्वेसेवाही विस्कळीत झाली. उत्तर प्रदेशातील बिजनौर, सहारणपूर, पीलभित, फिरोजाबाद, चित्रकुट, मुझफ्फरनगर, मथुरा, कानपूर, सीतापूर, मिर्झापूर, संबल, बांदा, कनौज, रायबरेली आणि उन्नाव या जिल्ह्यांनादेखील धुळीच्या वादळाचा जबर फटका बसला आहे. बिजनौरमध्ये तीन, सहारणपूरमध्ये दोन, कानपूर देहत येथे तीन, बरेली, चित्रकुट, रायबरेली आणि उन्नाव येथे प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. धुळीच्या वादळाचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला दक्ष राहण्याचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. गरजूपर्यंत मदत पोचवताना कामात कोणतीही कसूर ठेवू नका, असे ताकीद आदित्यनाथ यांनी दिली आहे. जखमींवर उपचार सुरू असून, वादळामुळे शेकडो घरांची पडझड झाली आहे. विजेचे खांब कोसळल्याने अनेक गावांत अंधार पसरला आहे. 

वेधशाळेचा इशारा  
वेधशाळेने काही भागांत तीव्र चक्रीवादळाचा इशारा दिला असून, त्यात गोरखपूर, बलिया, माऊ, गाझीपूर, आंबेडकरनगर, एस. के. नगर, बस्ती, कुशीनगर, महाराजगंज, सिद्धार्थनगर, गोंडा, बलरामपूर, अलिगड, इटाह, बिजनौर, बागपत यांसह अन्य जिल्ह्यांत दक्षतेचा इशारा दिला आहे. आदित्यनाथ यांनी मृतांच्या नातेवाइकांना चार लाख, तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा केली. 

राजस्थानालाही वादळाचा तडाखा  
राजस्थानच्या धोलपूर, अल्वर, भारतपूरला वादळाचा जबर तडाखा पडला. धुळीचे वादळामुळे तीसहून अधिक जण मृत्युमुखी पडले असून, जखमींचा आकडा शंभर असल्याचे सांगण्यात येत आहे. किरकोळ जखमींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे यांनी प्रशासनाला सूचना दिल्या असून, वादळग्रस्तांना तातडीने मदत करण्याचे आदेश दिले आहेत. धोलपूरध्ये सर्वाधिक 17 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या नातेवाइकांना राजस्थान सरकारकडून प्रत्येकी चार लाख रुपये, तर जखमींची स्थिती पाहून दोन लाख ते 60 हजार रुपयांपर्यंतची मदत जाहीर करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश सरकारनेदेखील राज्यातील मृतांच्या नातेवाइकांना मदत जाहीर केली आहे. 

दिल्लीतही वादळ, तापमानात घसरण  
दिल्ली परिसरात वादळामुळे काल रात्री वातावरणात अचानक बदल झाला. दिवसभर कडक उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असताना सायंकाळी पाचनंतर ताशी 50 किलोमीटर वेगाने वारे वाहू लागले. कालांतराने जोरात पाऊसही पडला. त्याचा परिणाम आयपीएलच्या सामन्यावरही झाला. वादळ आणि पाऊस त्यामुळे कमाल तापमान 38 अंश सेल्सिअसवरून 20 अंश सेल्सिअसवर पोचले. दिल्लीत ठिकाठिकाणी झाड पडल्याचे आणि भिंत कोसळल्याचे वृत्त आहे. अनेक ठिकाणी वाहतूकही कोलमडली होती.  

Web Title: Rainstorm kills over 100 at least injures over 160 in India