पारले-जीच्या बिस्किट कारखान्यातून 26 बाल कामगारांची सुटका

वृत्तसंस्था
सोमवार, 17 जून 2019

छत्तीसगडमधील रायपूर जिल्हा शीघ्र कृतीदलाने पारले-जी या बिस्किट उत्पादक कंपनीतून 26 बाल कामगारांची शनिवारी (ता. 15) सुटका केली.

रायपूर : छत्तीसगडमधील रायपूर जिल्हा शीघ्र कृतीदलाने पारले-जी या बिस्किट उत्पादक कंपनीतून 26 बाल कामगारांची शनिवारी (ता. 15) सुटका केली. ही सर्व मुले पारले-जीच्या रायपूर येथील कारखान्यात बाल कामगार म्हणून काम करीत होती.

रायपूरमधील अमासिवनी भागात मोठ्या प्रमाणात लहान मुले बाल कामगार म्हणून काम करत असल्याची माहिती बीबीए या सामाजिक संस्थेला मिळाली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हे ऑपरेशन राबविण्यात आले. यावेळी पारले-जी बिस्किट कारखान्यात काम करणाऱ्या 26 मुलांना आम्ही ताब्यात घेतले, अशी माहिती नवनीत स्वर्णकार यांनी दिली. 

मुलांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत त्यांना सलग बारा तास काम करावे लागत होते. आणि यासाठी महिन्याकाठी फक्त पाच ते सात हजार रुपये इतका मोबदला मिळत होता.

"आपल्या देशातील प्रसिद्ध असणाऱ्या ब्रँण्डपैकी पारले-जी हा एक ब्रँण्ड आहे. मात्र, या कंपनीत बाल कामगारांचा वापर होतो आहे, हे मान्य करणे अवघड झाले आहे,'' अशी प्रतिक्रिया बीबीएचे सीईओ समीर माथूर यांनी दिली आहे.

यातील बहुतेक मुले ही 12-16 वर्षे या वयोगटातील असून ती मध्यप्रदेश, झारखंड, ओडिशा आणि बिहार या राज्यातील आहेत. मुलांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना राज्य सरकारच्या बाल सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. जेजे कायद्याच्या कलम 79 अंतर्गत पारले-जी कंपनीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Raipur 26 child laborers rescued from ParleG biscuit factory