भाजपचा सुपडा साफ; पाचही जागांवर पराभव

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांनी भाजपच्या अहंकाराविरोधात मिळविलेला हा विजय असल्याचे म्हटले आहे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष अशोक परनानी यांनी 2019 मध्ये विजय मिळविण्यासाठी कठोर प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे.

जयपूर - एकीकडे अर्थसंकल्पातून 2019 लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घोषणा होत असताना दुसरीकडे राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा सुपडासाफ झाल्याचे चित्र पहायला मिळाले. यावर्षीच राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून, भाजपला हा मोठा झटका मानण्यात येत आहे. 

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजस्थानमधील विजयाबद्दल कौतुक करताना राजस्थानमधील नागरिकांनी भाजपला नाकारल्याचे म्हटले आहे.

राजस्थानमधील अजमेर आणि अल्वर या लोकसभेच्या जागांवर काँग्रेसने मोठा विजय मिळविला आहे. अल्वर येथे काँग्रेसचे उमेदवार करणसिंग यांनी भाजपचे उमेदवार जसवंतसिंह यादव यांचा 1 लाख 56 हजार मतांनी पराभव केला. तर, अजमेरमध्ये काँग्रेसचे उमेदवार रघु शर्मा यांनी मोठी आघाडी घेतली आहे. मंडलगढ विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या विवेक ढाकर यांनी विजय मिळविला.

पश्चिम बंगालमध्ये उलुबेरिया या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत तृणमुल काँग्रेसचे उमेदवार सजदा अहमद यांनी भाजप उमेदवार अनुपम मलिक यांचा 4 लाख 74 हजार मतांनी पराभव केला. तृणमुलने विधानसभेच्या एक जागेवरही विजय मिळविला आहे. 

राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांनी भाजपच्या अहंकाराविरोधात मिळविलेला हा विजय असल्याचे म्हटले आहे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष अशोक परनानी यांनी 2019 मध्ये विजय मिळविण्यासाठी कठोर प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे.

Web Title: Rajasthan bypolls Congress clean sweeps BJP in Ajmer Alwar