#DecodingElections : राहुल गांधींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब; मोदींना धोका

मंगळवार, 11 डिसेंबर 2018

आजच्याच दिवशी म्हणजे 11 डिसेंबर 2017 मध्ये काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारणाऱ्या राहुल गांधी यांना आजच्याच दिवशी बरोबर एका वर्षानंतर मोठे यश मिळताना दिसत आहे.

आजच्याच दिवशी म्हणजे 11 डिसेंबर 2017 मध्ये काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारणाऱ्या राहुल गांधी यांना आजच्याच दिवशी बरोबर एका वर्षानंतर मोठे यश मिळताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना कडवे आव्हान देणाऱ्या राहुल गांधींनी पाच राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसला नवसंजीवनी मिळवून दिली आहे. याचा फायदा नक्कीच काँग्रेसला आगामी लोकसभा निवडणुकीत होणार हे निश्चित.

लोकसभेची सेमी फायनल मानल्या जाणाऱ्या पाच राज्यांमधील निवडणुकांच्या मतमोजणीतील पहिल्या तासाभरात सत्ताधारी भाजपला जोरदार दणका बसला आहे. पाचही राज्यांमध्ये काँग्रेसने आघाडी घेतली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा विरुद्ध काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी या लढाईत प्रथमच राहुल यांची सरशी होताना दिसत आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये दीर्घ कालावधीपासून भाजपची सत्ता आहे. ही राज्ये यंदा काँग्रेसने खेचून घेतली आहेत, असे मतमोजणीच्या सुरवातीचे चित्र आहे. 

विशेष म्हणजे, गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच राहुल गांधी यांनी काँग्रेसची सूत्रे अधिकृतरित्या हाती घेतली होती. या वर्षपूर्तीच्या मुहूर्तावरच काँग्रेसने पाच राज्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली पाचही राज्यांत काँग्रेस पूर्ण तयारीनिशी उतरली होती. याचा फायदा काँग्रेसला जाणार आहे. भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपशासित राज्यांतील मुख्यमंत्र्यांना प्रचारात उतरविले होते. मात्र, याचा फायदा त्यांना होताना दिसला नाही.

काँग्रेसने हिंदुत्वाचे राजकारण, राफेल करार, शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी या मुद्द्दयांवरून जोरदार प्रचार केला. राहुल गांधी यांनी मोदींवर सतत जोरदार टीका केली. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली यापूर्वी काँग्रेसला कर्नाटक आणि पंजाबमध्ये सत्ता मिळविण्यात यश आले होते. पण, गुजरात त्यांच्या हातातून निसटले होते. आता काँग्रेसने सत्तेची सेमीफायनलमध्ये बाजी मारत भाजपसमोर फायनलमध्ये मोठे आव्हान उभे केले आहे.

Web Title: Rajasthan Chhatisgarh Madhya Pradesh elections establishes Rahul Gandhi as a leader