माझी तर 'ही' जात: नरेंद्र मोदी

वृत्तसंस्था
सोमवार, 26 नोव्हेंबर 2018

भिलवाडा (राजस्थान): मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, मी गरीब आईला चुलीवर जेवण बनवताना पाहिले. म्हणूनच मी सत्तेवर येताच देशातील 90 टक्के घरांमध्ये एलपीजी गॅस सिलिंडर पोहोचवले. काँग्रेसवाले माझी जात विचारतात. पण ज्यावेळी देशाचा पंतप्रधान म्हणून परदेशात जातो, त्यावेळी देशातील सव्वाशे कोटी भारतीय हीच माझी जात असते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षामध्ये शाब्दिक युद्ध रंगले आहे. काँग्रेस नेते सी. पी. जोशी यांनी मोदींच्या जात आणि धर्माबाबत प्रश्न विचारले होते. भिलवाडा येथे झालेल्या प्रचारसभेदरम्यान मोदींनी जातीयवादाच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर टीका केली. मोदी म्हणाले, आज (सोमवार) संविधान दिवस आहे. संविधानाचे तयार करणारे बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातून भेदभाव नष्ट करण्यासाठी मार्ग दाखवला. मात्र, काँग्रेस आणि त्यांचे नेते मोदींची जात कोणती?, असा प्रश्न विचारत आहे. काँग्रेस जातीयवादाला प्रोत्साहन देणारा पक्ष आहे. जेव्हा देशातील पंतप्रधान परदेशात जातो, त्यावेळी त्याची जात एकच असते आणि ती म्हणजे ‘सव्वाशे कोटी भारतीय’.

‘तुम्ही चार पिढी देशावर राज्य केले. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळीकडे यांचे उद्योग सुरु होते. पंचायतपासून संसदेपर्यंत त्यांचीच सत्ता होती. पण तुमच्या काळात ग्रामीण भागातील 40 टक्के घरांमध्येही शौचालय नव्हते. भाजपाच्या काळात आम्ही हे प्रमाण 95 टक्क्यांपर्यंत नेले. काँग्रेसने काम केले असेल तर ते हिशेब देतील. पण ते जात कोणती, वडील कोण, असेच प्रश्न विचारत आहेत. मी काही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, मी आईला चुलीवर जेवण बनवताना पाहिले होते. म्हणूनच मी सत्तेवर येताच देशातील 90 टक्के घरांमध्ये एलपीजी गॅस सिलिंडर पोहोचवले आहे,' असाही दावा मोदींनी केला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rajasthan election 2018 narendra modi slams congress over cast remark c p joshi