अल्पवयीन विद्यार्थीनीवर आठ शिक्षकांचा बलात्कार

वृत्तसंस्था
शनिवार, 25 मार्च 2017

एका अल्पवयीन शालेय विद्यार्थीनीवर खाजगी शाळेतील आठ शिक्षकांनी बलात्कार करून या संपूर्ण प्रकाराचे छायाचित्रण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

बिकानेर (राजस्थान) - एका अल्पवयीन शालेय विद्यार्थीनीवर खाजगी शाळेतील आठ शिक्षकांनी बलात्कार करून या संपूर्ण प्रकाराचे छायाचित्रण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पीडित विद्यार्थीनीच्या वडिलांनी एप्रिल 2015 मध्ये घडलेल्या या प्रकाराची तक्रार शुक्रवारी पोलिसांकडे केल्याने ही घटना समोर आली आहे. पीडित मुलगी आजारी असून तिच्यामध्ये कर्करोगाची लक्षणे दिसत असल्याचेही तिच्या वडिलांनी सांगितले आहे. सामूहिक बलात्कार आणि बालकांविरूद्धच्या लैंगिक छळाच्या कलमांतर्गत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाच्या चौकशीसाठी महिलांची समिती स्थापन करण्यात आली आहे.

राजस्थानमध्ये हे प्रकरण चांगलेच तापले असून मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर विरोधकांनी निशाणा साधला आहे. "राजस्थानमध्ये महिला मुख्यमंत्री आहेत. मात्र तरीही त्यांना आमच्या बहिणी, आई आणि राज्यातील महिला यांना सुरक्षा पुरविण्याचे समजत नाही', अशी टीका काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी केली आहे. तर 'हा फार धक्कादायक प्रकार आहे. हा प्रकार 2015 मध्ये घडला आणि आता 2017 मध्ये तो समोर आला आहे. त्यामुळे मला असे वाटते की, या प्रकरणाचा खूपच बारकाईने तपास करायला हवा', अशा प्रतिक्रिया राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी सदस्य शमिना शफीक यांनी व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, चार जणांनी आपल्याला मारहाण केल्याची तक्रार आठ आरोपी शिक्षकांपैकी एकाने यापूर्वीच पोलिसांकडे केली आहे. त्या मारहाण करणाऱ्या चार जणांमध्ये पीडित विद्यार्थीनीच्या दोन चुलत भावांचाही समावेश आहे. या दोन्ही प्रकरणाची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Rajasthan: Man accused 8 teachers of raping his minor daughter, filming act