esakal | राजस्थानमध्ये सत्ताधारी काँग्रेसला धक्का, पायलट यांच्यासह दिग्गजांच्या मतदारसघात पराभव
sakal

बोलून बातमी शोधा

ashok gehlot sachin pilot.jpg

काँग्रेसच्या विजयाचा दावा करणारे अनेक मंत्रीही त्यांच्या मतदारसंघात अपयशी ठरले आहेत.

राजस्थानमध्ये सत्ताधारी काँग्रेसला धक्का, पायलट यांच्यासह दिग्गजांच्या मतदारसघात पराभव

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

जयपूर- राजस्थानमध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालांनी सर्वांनाच धक्का बसला आहे. दिवसभर आघाडीवर असलेल्या काँग्रेसवर सायंकाळी भाजपने बाजी मारल्याचे दिसून आले. रात्री उशिरापर्यंत आलेल्या निकालांनुसार 4051 पंचायत समिती सदस्यांचे निकाल जाहीर झाले. यात काँग्रेसने 1718 जागांवर विजय मिळवला. तर भाजपने 1836 जागा जिंकत सर्वांचे अंदाज खोटे ठरवले. या निवडणुकीत भाजपला मोठा फायदा झाला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी अत्यंत खराब राहिली. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसच्या दिग्गजांना मोठा झटका बसला आहे. काँग्रेसच्या विजयाचा दावा करणारे अनेक मंत्रीही त्यांच्या मतदारसंघात अपयशी ठरले आहेत. चार टप्प्यात झालेल्या या निवडणुकीचे निकाल धक्कादायक आहेत. या निकालामुळे भाजपचे मनोबल वाढले आहे. 

काँग्रेसच्या दिग्गजांना झटका


काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंह डोटासरा यांच्यापासून ते माजी प्रदेशाध्यक्ष तथा माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना पंचायत समितीच्या निवडणुकीत फटका बसला आहे. सहकार मंत्री उदयलाल अंजना यांच्या मतदारसंघातील 17 पैकी केवळ 3 जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत. क्रीडा मंत्री अशोक चांदना यांच्या मतदारसंघातील 13 जागांवर भाजप तर 10 जागांवर काँग्रेस विजयी झाली आहे. अजमेरमध्ये आरोग्य मंत्री रघु शर्मा यांनाही मोठी धक्का बसला आहे. त्यांच्या मतदारसंघातील पंचायत समितीच्या 11 जागांपैकी 9 वर भाजपचे वर्चस्व राहिले. काँग्रेसला तिथे केवळ 2 जागा मिळाल्या 

हेही वाचा- मुस्लिम व्यक्तीने हनुमान मंदिरासाठी दान केली जमीन

सचिन पायलट यांना पंचायत समिती निवडणुकीत दुहेरी झटका बसला आहे. संघटनेत पुन्हा आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत असलेले पायलट यांना टोंक आणि अजमेर दोन्ही ठिकाणी चमक दाखवता आली नाही. टोंकमधील जिल्हा परिषदेच्या 25 जागांपैकी काँग्रेसला केवळ 10 जागा मिळाल्या तर अजमेर पंचायत समिती निवडणुकीतही काँग्रेसची कामगिरी विशेष राहिली नाही. पायलट हे 2014 पर्यंत अजमेरचे खासदार होते. तर आरोग्य मंत्री रघु शर्मा हेही याच मतदारसंघातील आहेत. 

या निवडणुकीत अनेक ठिकाणी अपक्ष आणि हनुमान बेनिवाल यांच्या आरएलपी पक्षाची भूमिका महत्त्वाची ठरली. त्यांनी काँग्रेस आणि भाजपचाही खेळ बिघडवून टाकला. आरएलपी 56 आणि 422 जागांवर अपक्षांनी झेंडा फडकवला. त्याचबरोबर सीपीआयएमने 16 जागांवर विजय मिळवला. 

हेही वाचा- आंध्रप्रदेशात शेकडो लोक आजारी पडण्यामागचं रहस्य उलगडलं; धक्कादायक माहिती समोर

दरम्यान, काँग्रेसच्या पराभवामागे गटबाजी हे प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात येते. त्याचबरोबर डुंगरपूर आंदोलन, गुर्जर आंदोलन काँग्रेसच्या पराभवाचे कारण ठरले. काँग्रेस अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात विभागली गेल्याचे प्रमुख कारण सांगितले जाते. त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांची निवड न करणे, तिकीट वाटपात घराणेशाहीला महत्त्व दिल्याचेही बोलले जाते.