रजनीकांत यांनी चित्रपटांमध्येच काम करावे

पीटीआय
मंगळवार, 23 मे 2017

कलाकारांनी राजकारणात येऊ नये
केवळ रजनीकांत हेच नव्हे, तर चित्रपटक्षेत्रातील व्यक्तींनी राजकारणात येणे योग्य नसल्याचे आपले मत असल्याचेही स्वामी यांनी स्पष्ट केले.

नवी दिल्ली : सुपरस्टार रजनीकांत यांच्या राजकारण प्रवेशाची चर्चा सुरू असतानाच भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी या संभाव्य प्रवेशाला कडाडून विरोध केला आहे. रजनीकांत यांना राज्यघटनेचे काहीही ज्ञान नसल्याने त्यांनी चित्रपटक्षेत्रामध्येच स्वत:ला मर्यादित ठेवावे, असा सल्ला स्वामी यांनी दिला आहे.

सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकारण प्रवेशाबाबत सूतोवाच केल्यानंतर गेल्या आठवड्यापासून याबाबतच्या चर्चेला उधाण आले आहे. याबद्दल पत्रकारांनी स्वामी यांना विचारले असता ते म्हणाले,"" तमिळनाडूतील सध्याच्या राजकीय परिस्थिती हाताळण्यासाठी रजनीकांत हे योग्य व्यक्ती नाहीत. त्यांना राज्यघटना, मूलभूत अधिकार किंवा अशा इतर तत्वांबाबत काहीही माहिती नाही. ते उत्तमरित्या रसिकांचे मनोरंजन करू शकत असल्याने त्यांनी चित्रपटक्षेत्रातच राहावे.''

केवळ रजनीकांत हेच नव्हे, तर चित्रपटक्षेत्रातील व्यक्तींनी राजकारणात येणे योग्य नसल्याचे आपले मत असल्याचेही स्वामी यांनी स्पष्ट केले. राजकारणात आलेल्या चित्रपट कलाकारांमुळे राज्याचा विकास खुंटला असल्याचा दावाही त्यांनी केला. रजनीकांत हे कोणत्या पक्षामध्ये प्रवेश करण्याची शक्‍यता असल्याची चर्चा माध्यमांनी रंगविल्याबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, रजनीकांत हे मूळ कानडी असल्याने त्यांच्या तमिळनाडूच्या राजकारणातील संभाव्य प्रवेशाला चेन्नईमधील एका कट्टर तमिळी गटाने विरोध करत त्यांच्या निवासस्थानाबाहेर आज निदर्शने केली.

Web Title: rajinikanth should work only in films