राजनाथ सिंह सियाचीन दौऱ्यावर जाणार

वृत्तसंस्था
रविवार, 2 जून 2019

राजनाथ सिंह पहिल्या अधिकृत दौऱ्यासाठी सोमवारी (ता. 3) सियाचीनला भेट देणार आहेत. या प्रसंगी लष्कर प्रमुख बिपिन रावत त्यांच्यासोबत उपस्थित असणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

नवी दिल्ली : देशाचे नवे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काल (ता.1) संरक्षणमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर राजनाथ सिंह पहिल्या अधिकृत दौऱ्यासाठी सोमवारी (ता. 3) सियाचीनला भेट देणार आहेत. या प्रसंगी लष्कर प्रमुख बिपिन रावत त्यांच्यासोबत उपस्थित असणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

संरक्षणमंत्री म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी, राजनाथ सिंह यांनी राष्ट्रीय शौर्य स्मारकाला भेट दिली होती. तिथे त्यांनी देशसेवेत शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी लष्कर प्रमुख बिपिन रावत, वायुदल प्रमुख बी. एस. धनोआ आणि नौदल प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंह उपस्थित होते. यावेळी त्यांनी तिन्ही सेनादल प्रमुखांशी संवाद साधला आणि सैन्यापुढील आव्हाने आणि कामांविषयी अहवाल तयार करण्याबाबत सूचना केल्या.

सियाचिनमध्ये माजी संरक्षण मंत्र्यांनी केला होता दसरा साजरा

मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात सप्टेंबर 2017 ते मे 2019 पर्यंत निर्मला सीतारामन यांनी संरक्षणमंत्री म्हणून काम पाहिले होते. संरक्षणमंत्री असताना निर्मला सीतारामन यांनी सियाचिनमधील सैनिकांसह दसरा साजरा केला होता. तसेच सीतारामन त्यांनी लेह आणि काराकोरमला जोडणाऱ्या एका पुलाचे उद्घाटनही केले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajnath Singh will visit Siachen on his first official trip