राजनाथसिंह जम्मू-काश्मिरला रवाना, अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेचा घेणार आढावा

वृत्तसंस्था
गुरुवार, 7 जून 2018

अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून बंडखोरांच्या विरोधातील कारवाई थांबवण्याच्या निर्णयाबाबत राजनाथसिंह आढावा घेतील. याशिवाय, ते मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची भेट घेणार आहेत आणि अमरनाथ यात्रेच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेणार आहेत.

दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह आजपासून दोन दिवसांच्या जम्मू-काश्मिर दौऱ्यावर रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत पंतप्रधान कार्यालयाचे गृहसचिव, जम्मू आणि काश्मिरचे सहसचिव आणि मंत्री जितेंद्रसिंह आहेत. अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून बंडखोरांच्या विरोधातील कारवाई थांबवण्याच्या निर्णयाबाबत आढावा घेतील. याशिवाय, ते मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची भेट घेणार आहेत आणि अमरनाथ यात्रेच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेणार आहेत.

राजनाथसिंह कुपवाडा, श्रीनगर आणि जम्मूच्या निवडक भागात ही भेट देणार आहेत. मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्याकडून देण्यात येणाऱ्या इफ्तार पार्टीला देखील ते उपस्थित राहणार आहेत. याव्यतिरिक्त, ते क्रीडा, पर्यटन आणि रोजगार यांच्या माध्यमातून राज्यातील तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नवीन योजनेबाबत सर्व पक्षांशी चर्चा करणार आहेत. 

अधिकाऱ्यांच्या  म्हणण्यानुसार, राजनाथ सिंह यांच्या दौऱ्यादरम्यान 16 मे नंतर राज्य सरकार सुरक्षेवर भर देणार आहे. रमजान दरम्यान, लष्करी कारवाईपासून सुरक्षा तुकड्यांना रोखले आहे. असे असूनही, सुरक्षा कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. राज्यपाल एन. एन. व्होरा, मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती, उच्च प्रशासकीय, पोलिस आणि निमलष्करी दल यांच्या बैठकीनंतर, ईद झाल्यावरही लष्करी कारवायांना स्थगिती देऊ शकतात. जम्मू काश्मिरमध्ये 28 जूनपासून अमरनाथ यात्रा सुरू होत आहे. कुपवाडा आणि बारामुल्ला येथील एस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट योजनेअंतर्गत सुरू असलेल्या योजनांचा आढावाही गृहमंत्री राजनाथसिंह घेणार आहेत. 

दौऱ्यापूर्वी पत्रकार दिनेश्वर शर्मा आणि गुप्तचर अधिकाऱ्यांसमवेत बैठक -
गृह मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजनाथ सिंह यांनी वार्तालाप करण्यासाठी नियुक्त केलेल्या विशेष प्रतिनिधी दिनेश्वर शर्मांसह गुप्तचर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. शर्मा यांनी म्हटले आहे की, घाटी येथील दहशतवाद्यांविरोधात लष्करी कारवाई दरम्यान तेथील सामान्य तरुणांना  मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेले प्रयत्न पूर्णपणे यशस्वी झालेले नाहीत. म्हणूनच गृहमंत्रालयाने युवकांसाठी एक नवीन योजना तयार केली आहे. याशिवाय, अमरनाथ यात्रेदरम्यान दहशतवादी हल्ल्यांबाबत गुप्तचर यंत्रणेनेही केंद्र सरकारकडे चिंता व्यक्त केली आहे. शुक्रवारी दिल्लीत परतण्यापूर्वी राजनाथसिंह प्रसारमाध्यमांसमोर बोलतील. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rajnathsinha visit to jammu and kashmir to review of amarnath yatra security