पायलट वेलकम बॅक; राहुल गांधींच्या भेटीनंतर काँग्रेसनं केलं स्वागत

सकाळ वृत्तसेवा
Monday, 10 August 2020

काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह प्रियांका गांधी यांच्यात चर्चा झाली. या भेटीनंतर काँग्रेसने अधिकृत घोषणा करताना दोघांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचं पक्षाच्या नेत्यांनी म्हटलं आहे.

नवी दिल्ली - राजस्थानातील काँग्रेसमध्ये सुरु झालेला अंतर्गत वाद आता संपण्याची चिन्हे दिसत आहेत. काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह प्रियांका गांधी यांच्यात चर्चा झाली. या भेटीनंतर काँग्रेसने अधिकृत घोषणा करताना दोघांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचं म्हटलं आहे. काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी सचिन पायलट यांचे काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा स्वागत केलं आहे. 

सिंघवी यांनी म्हटलं की, सचिन पायलट वेलकम बॅक, राजस्थान भवनाची वास्तू तुमची वाट बघत आहे. राहुल गांधी आणि त्यांच्या पूर्ण टीमचे अभिनंदन. अशोक गेहलोत यांना विसरून चालणार नाही. त्यांचा राजकीय अनुभव फसण्याची शक्यता दुर्मीळ आहे. 

ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सचिव केसी वेणुगोपाल राव यांनी म्हटलं की, सचिन पायलट यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. सचिन पायलट यांनी राहुल गांधी यांच्याकडे सविस्तर म्हणणे मांडले. दोघांमध्येही स्पष्ट आणि निर्णायक अशी चर्चा झाली आहे. सचिन पायलट हे राजस्थान काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस सरकारच्या हिताचं काम करतील. 

दरम्यान, राजस्थानात काँग्रेसच्या सत्तेला या प्रकारामुळे एक प्रकारे आव्हानच दिलं होतं. यावर उपाय शोधण्यासाठी सचिन पायलट आणि त्यांच्या गटातील आमदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना सोडवण्यासाठी तीन सदस्यांची समिती स्थापन करण्यात येईल. त्यानंतर योग्य तो प्रस्ताव मांडला जाईल. हा निर्णय काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी घेतला आहे.

हे वाचा - राजस्थान : सचिन पायलट यांनी घेतली राहुल गांधींची भेट

राहुल गांधी आणि सचिन पायलट यांच्यातील चर्चा ही सकारात्मक होती. 14 ऑगस्टला राजस्थानच्या विधानसभेचं अधिवेशन आहे. याआधी यावर निर्णय घेतला जाईल असं म्हटलं जात आहे. काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन पायलट थेट काँग्रेसच्या वरिष्ठांच्या संपर्कात आहेत. राजस्थान विधानसभेचं अधिवेशन सुरु होण्याआधी पक्षातील हा वाद पूर्ण मिटवण्याचा प्रयत्न असेल. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rajsthan congress crisis sachin pilot welcome back meeting with rahul gandhi