राजस्थान : गेहलोत अडचणीत; 6 मंत्र्यांसह 11 जण जैसलमेरला पोहोचलेच नाही

ashok gehlot
ashok gehlot

जयपूर - राजस्थानमध्ये सुरु असलेलं राजकीय नाट्यात प्रत्येक दिवशी नवीन घडामोडी घडत आहेत. शुक्रवारी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी त्यांच्या आमदारांना जयपूरमधून जैसलमेर इथं हलवलं. यावेळी गेहलोत यांचे 11 सहकारी जैसलमेर इथं पोहोचलेच नसल्याचं समोर आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेहलोत सरकारमधील 6 मंत्री आणि 5 आमदार अजुनही जैसलमेर इथं पोहोचलेले नाहीत. यामुळे पुन्हा एकदा घोडेबाजाराची चर्चा सुरू झाली आहे. 

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जयपूरमधून जैसलमेर इथं न पोहोचलेल्यांमध्ये परिवहन मंत्री प्रताप सिंग खाचरियावास, आरोग्य मंत्री डॉक्टर रघु शर्मा, क्रीडा मंत्री चांदना, कृषी मंत्री लालचंद कटारिया, आरोग्य राज्यमंत्री सुभाष गर्ग, सहकारमंत्री उदयलाल अंजना, आमदार जगदीश जांगिद, आमदार अमित चाचाण, आमदार परसराम मोरदिया, आमदार बाबूलाल बैरवा, आमदार बलवान पूनिया यांचा समावेश आहे. गेहलोत यांच्या गटातील हे 11 जण जैसलमेरला पोहचले नसल्यानं खळबळ उडाली आहे. 

याआधी आमदारांच्या शिफ्टिंगवरून विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गेहलोत यांनी म्हटलं होतं की, आमचे आमदार इतक्या दिवसांपासून जयपूरमध्ये होते. त्यांना मानसिक त्रास दिला जात होता. त्यांच्यावर आणि घरच्या लोकांवर दबाव टाकला जात होता. या दबावापासून त्यांना मोकळं करण्यासाठी शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला. लोकशाहीला वाचवण्याचं प्रत्येकाचं कर्तव्य असल्याचंही ते म्हणाले होते. 

गेहलोत यांचे आमदार हलवण्याची तयारी सुरु असताना राजस्थानचे काँग्रेस नेते महेश जोशी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. महेश जोशी यांनी 24 जुलैला माजी उप मुख्यमंत्री सचिन पायलट आणि 18 इतर आमदारांच्या बाजुने सर्वोच्च न्यायालयात राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने सीपी जोशी यांच्या अपात्रतेची कारवाई स्थगित कऱण्याचा निर्णय दिला आहे. 

जयपूरमधून जैसलमेरला आमदार शिफ्ट करत असताना समोर आलेल्या आकडेवारीनंतर गेहलोत यांच्या दाव्याची पोल खोल झाली आहे. गेहलोत यांनी याआधी 109, 104 तर कधी 101 पेक्षा जास्त आमदार असल्याचं सांगितलं होतं. मात्र आमदार जैसलमेरला पोहचल्यानंतर वेगळंच चित्र दिसत आहे. जैसलमेरला फक्त 97 आमदार पोहोचल्याचं दिसलं. जयपूरमधून 97 आमदारच निघाल्याचे वृत्त आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com