कर्नाटकातून राज्यसभेसाठी प्रियंका गांधींना उमेदवारी? काँग्रेसकडून चाचपणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajya Sabha elections congress Priyanka gandhi  candidature for Rajya Sabha from Karnataka Bangalore

कर्नाटकातून राज्यसभेसाठी प्रियंका गांधींना उमेदवारी? काँग्रेसकडून चाचपणी

बंगळूर : काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा गांधी घराण्याच्या करिष्म्यावर अवलंबून राहण्याचा प्रयत्न करत असून पक्षातील एका गटाला काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी १० जून रोजी होणारी राज्यसभा निवडणूक कर्नाटकातून लढवावी, असे वाटते. विधानसभेतील पक्षीय बलाबलानुसार भाजपचे दोन तर काँग्रेसचा एक उमेदवार राज्यसभेवर सहज निवडून येऊ शकतो.

परंतु धर्मनिरपेक्ष जनता दलाकडे चौथा उमेदवार निवडून आणण्याचे संख्याबळ नाही. त्यामुळे चौथ्या जागेविषयी औत्सुक्य वाढले आहे. कर्नाटकातील राज्यसभेच्या चार जागा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, भाजपचे के. सी. राममूर्ती, जयराम रमेश आणि दिवंगत ऑस्कर फर्नांडिस या चार सदस्यांचा कार्यकाळ ३० जून रोजी संपुष्टात येत असल्याने रिक्त झाल्या आहेत.

कर्नाटकात २०२३ मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यासह राज्यातील काँग्रेसचे नेते प्रियांका गांधींना राज्यातून राज्यसभा निवडणूक लढवण्यासाठी आमंत्रित करण्याची योजना आखत आहेत. मात्र, एका काँग्रेस नेत्याच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक राज्यसभा निवडणुकीदरम्यान प्रियांकांचे नाव समोर येते. कर्नाटकातील विद्यमान राज्यसभा सदस्य जयराम रमेश यांना पुन्हा उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. दीपेंद्रसिंग हुड्डा यांनी हरियानातून निवडणूक लढविण्याचे आमंत्रण दिल्याने रमेश यांनी अन्य राज्यातून निवडणूक लढवली तर, पक्षाला दुसरा उमेदवार शोधावा लागेल.

निर्मला सीतारामन आणि के. सी. राममूर्ती यांना भाजप उमेदवारी देण्याची शक्यता आहे. चौथा सदस्य निवडण्यासाठी १३ ते १४ आमदार कमी असलेले धजद, काँग्रेस हे भाजपच्या अतिरिक्त मतांकडे लक्ष ठेवून आहेत. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा हे भाजप हायकमांडशी बोलण्याची शक्यता आहे.

दुसऱ्या जागेसाठी काँग्रेसला हवा पाठिंबा

काँग्रेसकडे राज्यसभेच्या चारपैकी एक जागा जिंकण्यासाठी पुरेशी संख्या आहे. मात्र दुसरी जागा जिंकण्यासाठी त्यांना धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या पाठिंब्याची आवश्यकता असेल. जयराम रमेश यांच्याशिवाय माजी आमदार इवो डिसोझा आणि माजी खासदार व्ही. एस. उग्रप्पा यांनीही पक्षाकडून उमेदवारीसाठी लॉबिंग सुरू केले आहे. ऑस्कर फर्नांडिस यांच्या निधनामुळे एक जागा रिक्त झाल्याने ख्रिश्चन समुदायाच्या काही सदस्यांनी कर्नाटकचे प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला यांच्याशी संपर्क साधला आहे.

Web Title: Rajya Sabha Elections Congress Priyanka Gandhi Candidature For Rajya Sabha From Karnataka Bangalore

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top