रिवंश राज्यसभा उपाध्यक्षपदी कायम राहणार ;जेडीयूचा हिरवा कंदील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जदयू नेते हरिवंश नारायण सिंह

हरिवंश राज्यसभा उपाध्यक्षपदी कायम राहणार ;जेडीयूचा हिरवा कंदील

नवी दिल्ली : बिहारमध्ये नितीशकुमार यांनी भाजपची साथ सोडून तेजस्वी यादव यांच्या राजदच्या साथीने पुन्हा सरकार स्थापन केले असले तरी त्याचे पसाद राज्यसभेच्या उपाध्यक्षपदावर उमटण्याची शक्यता कमी आहे. या पदावरील जदयू नेते हरिवंश नारायण सिंह यांना तूर्त कायम राहण्यास जदयू नेतृत्वाने हिरवा कंदील दाखविला आहे. ‘राज्यसभा उपाध्यक्षपद हे राजकारणाच्या पलीकडे असते त्यामुळे हरिवंश यांनी राजीनामा देण्याची गरज नाही‘, असे जदयू अध्यक्ष राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह यांनी स्पष्ट केले. यावर नितीशकुमार, खुद्द हरिवंश व महत्वाचे म्हणजे भाजपकडून अद्याप प्रतीक्रिया आलेली नाही.

जदयूने भाजप प्रणित एनडीएतून बाहेर पडणे हा एक राजकीय निर्णय आहे. हरिवंश हे वरिष्ठ सभागृहाचे उपाध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांनी या निणर्यावरून राजीनामा देण्याची गरज नाही. दोन्ही निर्णयांचे आपसात काही देणे घेणे नाही, असे सांगून लल्लन सिंह म्हणाले की लोकशाहीत संसदीय किंवा विधिमंडळ सदनाचे पीठासीन अधिकारीपद हे राजकीय परिप्रेक्षाच्या बाहेरचे असते व त्याकडे पक्षातीत दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे असे आमच्या (जदयू) नेतृत्वाचे मत आहे. राज्यसभेतील एनडीए बाहेरच्या अनेक पक्षांनी उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत कॉंग्रेस उमेदवार बी के हरिप्रसाद यांच्याएवजी हरिवंश यांना मतदान केले होते.

हरिवंश यांचा मुद्दा सभागृहाशी संबंधित असल्याने हरिवंश यांनी राजीनामा देण्याची गरज नाही. ‘आपण नितीशकुमार यांच्यामुळेच सार्वजनिक जीवनात आलो आहोत. महाआघाडीत पुन्हा जाण्यासह त्यांच्या प्रत्येक निर्णयाबरोबर आपण त्यांच्यासह असू‘, असे हरिवंश यांनी याआधीच स्पष्ट केले आहे,‘‘ अशीही पुस्ती लल्लन सिंह यांनी जोडली.

राज्यसभेत जदयू एनडीएबाहेर गेल्याने भाजप आघाडीचे बळ १०९ वर आले आहे. त्यामुळे अण्णाद्रमपुक, बीजू जनता दल, वायएसआर कॉंग्रेस यांची साथ मिळत असली तरी महत्वाच्या विधेयकावेळी मित्रपक्षांवरील भाजपचे अवलंबित्व आणखी वाढले आहे.

मोदी मंत्रिमंडळात आरसीपी सिंह यांचा समावेश करताना आपल्याला विरात घेतले नव्हते हा नितीशकुमार यांचा आरोप भाजप नेतृत्वाने फेटाळला आहे. नीतीशकुमार चुकीचे बोलत असल्याची तीव्र प्रतीक्रिया केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली. ते म्हणाले की आरसीपी सिंह यांच्या समावेशापूर्वी त्यांच्याशी दोनदा चर्चा केली होती. त्यांना केंद्रात दोन मंत्रीपदे हवी होती. मात्र आमच्या नेतृत्वाने त्याबाबत असमर्थता व्यक्त केली तेव्हा त्यांनी, राज्यसभेतील आरसीपी सिंह यांच्या समावेशाला होकार दिला.

किंबहुना त्यांनीच त्यांचे नाव सुचविल्यावर त्यांना मंत्री करण्यात आले. आरसीपी सिंह यांचेही नितीशकुमार यांच्याशी अलीकडेच बिनसल्यावर त्यांनी जदयूतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. आरसीपी सिंह यांच्याबाबत नितीशकुमार खोटे बोलत असून जर त्यांना त्यांचे नाव मान्य नव्हते तर आरसीपी सिंह तब्बल १३ महिने केंद्रात मंत्री होते तेव्हा नितीशकुमार एकदाही त्याबाबत पंतप्रधानांशी का बोलले नाहीत ? असा सवाल बिहार भाजपचे वरिष्ठ नेते, खासदार सुशीलकुमार मोदी यांनी विचारला.

Web Title: Rajya Sabha Vice President Rivansh Jdu Green Light

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..