राज्यसभेसाठी मराठी चेहऱ्यांची चर्चा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

नवी दिल्ली - राज्यसभेवर लवकरच पाठविण्यात येणाऱ्या राष्ट्रपतीनियुक्त नावांसाठी सत्तारूढ भाजपच्या सर्वोच्च पातळीवर ज्या नावांचा गंभीरपणे विचार सुरू आहे त्यात मराठी चेहऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 

नवी दिल्ली - राज्यसभेवर लवकरच पाठविण्यात येणाऱ्या राष्ट्रपतीनियुक्त नावांसाठी सत्तारूढ भाजपच्या सर्वोच्च पातळीवर ज्या नावांचा गंभीरपणे विचार सुरू आहे त्यात मराठी चेहऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 

संघाच्या ‘पांचजन्य’ व ‘ऑर्गनायजर’ या मुखपत्रांचे संपादक बदलण्याच्या हालचाली असून, राज्यसभेसाठी ‘ऑर्गनायजर’चे संपादक प्रफुल्ल केतकर किंवा ‘पांचजन्य’चे लेखक तुफैल चतुर्वेदी, तसेच ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा. अनिरुद्ध देशपांडे आदी नावे चर्चेत असल्याचे समजते. याशिवाय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडेही राज्यसभा सदस्यत्व स्वीकारण्याबाबत भाजपने विचारणा केल्याचे समजते. या सर्वांना अखेरच्या क्षणी राज्यसभेबाबत विचारणा किंवा निर्देश दिले जातील अशी माहिती समजते. काँग्रेसने आधीच पत्रकारितेतील एक केतकर (कुमार) येथे आणले आहेत. संसदेचे पावसाळी अधिवेशन १८ जुलैला सुरू होण्यापूर्वी नामनिर्देशित राज्यसभा खासदारांची नावे निश्‍चित करण्याचे भाजप व सरकारच्या नेतृत्वाने ठरविल्याचे दिसत आहे. 

राज्यसभेचे कामकाज गेली दहा वर्षे कौशल्याने हाताळणारे उपसभापती पी. जे. कुरियन यांची मुदत येत्या जुलैत संपत आहे. कुरियन यांची केरळातून लोकसभा लढण्याची इच्छा असल्याने त्यांना पुन्हा राज्यसभेवर आणले जाण्याची शक्‍यता अंधुक आहे.

Web Title: rajyasabha selection babasaheb purandare madhur dixit aniruddha deshpande politics