राख्या, गणेशमूर्ती स्वस्त; जीएसटीच्या कक्षेतून वगळले

GST
GST

नवी दिल्ली : गणेशमूर्ती व राख्या यांना वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) कक्षेतून पूर्ण वगळण्याचा मोदी सरकारने निर्णय केला आहे. राखीपौर्णिमा व गणेशोत्सव हे सण परंपरेचा सांस्कृतिक ठेवा असल्याने केंद्राने हा निर्णय घेतला, असा दावा केंद्रीय अर्थखात्याचे प्रभारी मंत्री पीयूष गोयल यांनी आज केला. 

गणेशोत्सव व राखीपौर्णिमा या सणांच्या तोंडावर सरकारने सर्व प्रकारच्या मूर्ती, हॅंडीक्राफ्टशी संबंधित सर्व वस्तू "जीएसटी'तून वगळल्या आहेत. कारण, हा आमच्या महान सांस्कृतिक परंपरेचा ठेवा आहेत. दरम्यान गोयल यांनी हा निर्णय अधोरेखित करताना ज्या प्रकारचा आविर्भाव केला, त्यावरून ते चांगलेच ट्रोल झाले आहेत. "जीएसटी तर तुम्हीच लावला होता. आता 10 रुपयांच्या राखीवरील "जीएसटी' हटविताना उपकार केल्यासारखे का बोलता? पेट्रोल-डिझेलवरील "जीएसटी' हटवून सामान्यांना दिलासा द्या, अशा प्रतिक्रिया ट्विटर वापरकर्त्यांनी दिल्या आहेत. 
"जीएसटी' कायद्यात गेल्या नऊ महिन्यांत तिसरा महत्त्वाचा फेरबदल झाला आहे. "जीएसटी' परिषदेने गेल्या 21 जुलैला झालेल्या बैठकीत अनेक उत्पादनांना करमुक्त केले होते. 27 जुलैपासून नवे दर अमलात येणे अपेक्षित होते. जीएसटी परिषदेने फ्रिज, एसी, व्हिडिओ गेम्स व कपडे धुण्याच्या यंत्रांसह 100 उत्पादनांवरील करात 28 वरून 18 टक्के इतकी लक्षणीय कपात केली होती. पेट्रोलमध्ये मिसळल्या जाणाऱ्या इथेनॉलवरील जीएसटी 18 टक्‍क्‍यांवरून पाच टक्‍क्‍यांपर्यंत खाली आणण्यात आला होता. सॅनिटरी नॅपकिन, सरकारने जारी केलेली विशेष नाणी, सोनेचांदीने न मढविलेल्या राख्या, संगमरवराच्या व लाकडाच्या मूर्ती आदी वस्तू "जीएसटी'च्या कक्षेतून वगळण्यात आल्या होत्या. 

गतवर्षी नोव्हेंबरमध्ये 213 वस्तूंवरील व जानेवारी 2018 मध्ये 54 वस्तू व 29 सेवांवरील जीएसटीमध्ये कपात केली गेली होती. निवडणूक वर्षात ही यादी वाढत जाईल, असा अंदाज जाणकार व्यक्त करतात. 

रेल्वेत महिलांसाठी 50 टक्के जागा 
रेल्वे खात्याची मूळ जबाबदारी असलेले पीयूष गोयल यांनी, रेल्वेच्या सर्व पदांसाठीच्या भरतीत महिलांना 50 टक्के राखीव जागा ठेवण्यात येतील, अशी घोषणा केली आहे. रेल्वे सुरक्षा दलात आगामी वर्षात 10 हजार जागा भरण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. गोयल यांनी रक्‍सूल-नरकटियागंज व सुपौल-अरारिया या बिहारमधील नव्या रेल्वेमार्गांचे उद्‌घाटन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केले, त्या वेळी ते बोलत होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com