राम मंदीर एक वर्षात बांधू- आदित्यनाथ

वृत्तसंस्था
मंगळवार, 31 जानेवारी 2017

गोरखपूर येथून लोकसभेत निवडून गेलेल्या आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून घोषित करावे, अन्यथा भाजपविरोधात 64 उमेदवार उभे करू, असा इशारा त्यांच्या नेतृत्वाखालील हिंदू युवा वाहिनी संघटनेने केली होती.  

भारतानेही अमेरिकेप्रमाणे प्रवेशबंदी करावी

बुलंदशहर- "राम हे अस्मितेचे प्रतीक असून, उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाचे सरकार बनल्यास एक वर्षाच्या आत राम मंदीर बांधून तयार होईल," असे प्रतिपादन भाजपचे खासदार आणि गोरक्षपीठाचे महंत योगी आदित्यनाथ यांनी केले.

आदित्यनाथ म्हणाले, "देशात आता असे वातावरण तयार झाले आहे की, जनता आयोध्येत राम मंदीर बनविण्याच्या बाजूने आहे. त्यामुळे भाजपचे सरकार बनल्यास एक वर्षाच्या राम मंदीर बांधून तयार केले जाईल."

राम मंदिराचा मुद्दा उच्च न्यायालयात असल्याबाबत आदित्यनाथा म्हणाले की, काही मुद्दे असे असतात जे न्यायालयाबाहेरही सोडविले जाऊ शकतात. राम मंदीर कसे बनणार हे निवडणुकांनंतरच स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले. 

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सात मुस्लिम देशांतील नागरिकांवर स्थलांतर बंदी घालत अमेरिका प्रवेशाला अटकाव केल्याच्या निर्णयाचे योगी आदित्यनाथ यांनी स्वागत केले असून, "भारतातील दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी अशाच प्रकारची कारवाई करणे आवश्यक आहे," असे विधान त्यांनी केले. 

उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात बुलंदशहर, ढोलाना (हापूर), लोणी (गाझियाबाद) या मतदारसंघांमध्ये योगी आदित्यनाथ भाजपचा प्रचार करणार आहेत. बुलंदशहर येथे आयोजित एका सभेत बोलताना त्यांनी वरील मत व्यक्त केले. 
भाजपने आपल्या 40 स्टार प्रचारकांच्या यादीतील वक्त्यांच्या सभा पश्चिम 'यूपी'मध्ये आयोजित करण्यास सुरवात केली आहे. धर्माच्या नावावर मतांचे विभाजन करण्याचा भाजपचा हा प्रयत्न असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली आहे. 

तत्पूर्वी, गोरखपूर येथून लोकसभेत निवडून गेलेल्या आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून घोषित करावे, अन्यथा भाजपविरोधात 64 उमेदवार उभे करू, असा इशारा त्यांच्या नेतृत्वाखालील हिंदू युवा वाहिनी संघटनेने केली होती.  

यापूर्वी बोलताना आदित्यनाथ यांनी "नरेंद्र मोदी हे डोनाल्ड ट्रम्प यांचे राजकीय गुरू आहेत," असा वादग्रस्त दावा केला होता. 
 

Web Title: ram mandir will be constructed in a year, says yogi adityanath