कुत्रं मेलं तरी मोदीच जबाबदार का?: श्रीराम सेना

वृत्तसंस्था
सोमवार, 18 जून 2018

आता या प्रकऱणी श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी लंकेश यांची तुलना कुत्र्याशी केली आहे. ते म्हणाले, की श्रीराम सेना आणि वाघमारे यांच्यात कोणताही संबंध नाही. तो आमचा सदस्यही नाही आणि कार्यकर्ताही नाही, हे मी स्पष्टपणे सांगत आहे. वाघमारे श्रीराम सेनेचा नाही, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता आहे. लंकेश यांच्या हत्येप्रकरणात मोदींना सतत प्रश्न विचारण्यात येतात. त्यांनी कर्नाटकात एखादा कुत्रा मेला तरी उत्तर द्यावे का?

बंगळूर : काँग्रेस सरकारच्या काळात कर्नाटकमध्ये दोन आणि महाराष्ट्रात दोन हत्या करण्यात आल्या. पण, त्यांना कोणीच प्रश्न विचारत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच सतत प्रश्न विचारले जात आहेत की तुम्ही गौरी लंकेश यांच्या हत्ये प्रकरणात गप्प का. कर्नाटकमध्ये कुत्र मेले तरी त्याला मोदीच जबाबदार का, असा प्रश्न श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी उपस्थित केला.

पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) या प्रकरणात श्रीराम सेनेचा विजयपुरा जिल्हाध्यक्ष राकेश मथ याला चौकशीसाठी समन्स पाठविले आहे. गौरी लंकेश यांच्यावर गोळी झाडणारा संशयित परशुराम वाघमारे श्रीराम सेना या हिंदुत्ववादी संघटनेचा सक्रिय सदस्य असल्यामुळे एसआयटीने मथ याची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटकच्या विजयपुरा जिल्ह्यातील सिंदागी शहरात जानेवारी 2012मध्ये तहसीलदार कार्यालयावर पाकिस्तानी झेंडा फडकविण्यात आला होता. यामध्ये मथ आणि वाघमारे यांचा कथितरीत्या सहभाग होता. लंकेश यांची गेल्या वर्षी 5 सप्टेंबरला बंगळूरस्थित निवासस्थानी प्रवेशद्वारावर गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. 

आता या प्रकऱणी श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी लंकेश यांची तुलना कुत्र्याशी केली आहे. ते म्हणाले, की श्रीराम सेना आणि वाघमारे यांच्यात कोणताही संबंध नाही. तो आमचा सदस्यही नाही आणि कार्यकर्ताही नाही, हे मी स्पष्टपणे सांगत आहे. वाघमारे श्रीराम सेनेचा नाही, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता आहे. लंकेश यांच्या हत्येप्रकरणात मोदींना सतत प्रश्न विचारण्यात येतात. त्यांनी कर्नाटकात एखादा कुत्रा मेला तरी उत्तर द्यावे का?

यावर नंतर स्पष्टीकरण देताना मुतालिक यांनी आपण लंकेश यांची तुलना कुत्र्याशी केली नसल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी मोदी यांनी प्रत्येक हत्येवर प्रतिक्रिया देणे योग्य नसल्याचेही म्हटले आहे. काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी मुतालिक यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. त्यांनी म्हटले आहे, ''गौरी लंकेश यांची कुत्र्याशी तुलना करणे घृणास्पद आहे. पंतप्रधान मोदींनी अद्यापही लंकेश यांच्या हत्येप्रकरणी निषेध नोंदविलेला नाही.''

Web Title: Ram Sena chief Pramod Muthalik likens Gauri Lankesh to a dog