थेट अयोध्येतून : आता राममंदिर होणार 72 एकर जागेवर!

मंगेश कोळपकर
Monday, 11 November 2019

2.77 एकर जागेचा वाद मिटला आहे. त्यामुळे तेवढ्या पुरता विचार न करता आम्ही पूर्ण 72 एकरचा विचार करीत आहोत.

अयोध्या : रामजन्मभूमीच्या जागेचा वाद आता मिटल्यामुळे नियोजित मंदिर 72 एकर जागेवर होईल आणि त्यासाठी नव्याने मंदिराचा आराखडा  तयार करण्यात येईल. हे मंदिर जगातील सर्वाधिक भव्य असे राम मंदिर असेल, असे रामजन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष महंत नृत्यगोपालदास शास्त्री महाराज यांनी 'सकाळ'ला मुलाखत देताना सोमवारी (ता.11) सांगितले. 

न्यासाचे गोपालदास महाराज गेल्या 25 वर्षाहून अधिक काळ अध्यक्ष आहेत. मनीरामदास छावणी या त्यांच्या मठात मुलाखत देताना त्यांनी नियोजित मंदिर उभारणीची दिशा स्पष्ट केली. 

- सातारचा मुख्यमंत्री पुन्हा हाेणार?

राममंदिर उभारणीचे स्वप्न पूर्णत्वास जाणार, याबद्दल त्यांचे अभिनंदन केले असता, 'साधू कधी स्वप्न पाहत नाही, तर साधना करतात आणि आम्ही जागरूकपणे तप केले आणि त्याची दखल घेतली गेली, याबद्दल समाधान वाटत आहे,' असे त्यांनी सांगितले. 

Image may contain: 1 person, sitting, beard and indoor

- रामजन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष महंत नृत्यगोपालदास शास्त्री महाराज

नियोजित मंदिराचा आराखडा, या विषयावर ते म्हणाले, ''2.77 एकर जागेचा वाद मिटला आहे. त्यामुळे तेवढ्या पुरता विचार न करता आम्ही पूर्ण 72 एकरचा विचार करीत आहोत. नव्या मंदिराचा आराखडा त्या नुसार करू. हे मंदिर जगातील एक दिमाखदार मंदिर असेल". त्यासाठी किती खर्च येईल, असे विचारले असता, प्रश्न पैशाचा नाही तर कल्पनाशक्तीचा आहे.

मंदिर आमच्या डोळयांसमोर आहे, त्यासाठी पैसा कमी पडणार नाही, याची आम्हाला खात्री आहे. कारण गरीब भाविकांपासून धनवान लोक, मोठ्या संख्येने आमच्यासोबत आहेत. अनेक उद्योगपतींनी आमच्याशी संपर्क साधला असून हवी ती मदत करण्यास ते तयार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. 
मंदिराचे काम सुरू झाल्यावर 5 वर्षांत ते पूर्ण होईल, असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला. 

- ठाकरे + पवार = सरकार; महाशिवआघाडी सत्तेत येणार

केंद्र सरकार नवा ट्रस्ट स्थापन करणार आहे, त्यात कोण-कोण असेल, हा त्यांचा प्रश्न असेल. पण अयोध्येतून 6 महंत असतील, हे निश्चित आहे, असेही महंत नृत्य गोपालदास शास्त्री यांनी स्पष्ट केले. 

रामजन्मभूमी न्यासाच्या प्रयत्नपूर्वक इच्छाशक्तीमुळे आणि पाठपुराव्यामुळे मंदिर होणार आहे. सरकारचा ट्रस्ट त्याची दिशा ठरविणार असली तरी मंदिर अयोध्येला पाहिजे तसेच होईल, असेही महाराज नृत्यगोपाल दास यांनी स्पष्ट केले. 

मशिदीसाठी अयोध्येतच 5 एकर जागा देण्यास न्यायालयाने केंद्र सरकारला आदेश दिला आहे, असे त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर ते म्हणाले, "अयोध्या आता जिल्हा झाला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन त्यांना कोठेही जागा देऊ शकते. तेथे ते मशिद उभारू शकतात. त्यांना काही मदत लागली तर देऊ." मशिद फ़ैजाबादमध्येही होऊ शकते, असे महाराजांबरोबर काम करणारे स्वामी आदित्यनाथ यांनी या वेळी स्पष्ट केले. 

- संजय राऊतच का बनलेत शिवसेनेच्या भात्यातील बाण?
 
जिल्हा, महापालिका अयोध्या! 

अयोध्येचा समावेश पूर्वी फ़ैजाबाद जिल्हा येथे होता. परंतु, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जिल्ह्याचे नाव नुकतेच बदलून आता अयोध्या जिल्हा केले आहे. तसेच यापूर्वी अयोध्या आणि फ़ैजाबाद या दोन नगर परिषदा होत्या. परंतु, चार महिन्यांपूर्वी त्यांची एकत्रित अयोध्या महानगरपालिका तयार करण्यात आली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने निकलापूर्वीपासूनच, याबाबत तयारी केली असावी, अशी येथे चर्चा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ram temple will be constructed on 72 acre area in Ayodhya