संगणक युगातही रामायण, महाभारताची मोहिनी

संगणक युगातही रामायण, महाभारताची मोहिनी

पौराणिक कथा व पात्रांचे मुलांमध्ये वाढते आकर्षण
नवी दिल्ली - 'रामायण' व "महाभारत' ही महाकाव्येच सर्व कलांचा स्रोत असल्याचे मत कला तज्ज्ञांनी मांडले आहे. सध्याच्या टेक्‍नोसॅव्ही पिढीलाही यातील पात्रांनी खिळून ठेवले आहे. मनोरंजनाचे अनेकविध पर्याय उपलब्ध असले तरी "छोटा भीम' आणि "बाल हनुमान' या कार्टूनना बच्चेकंपनीचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. यावरून तंत्रज्ञानाच्या या युगातही पौराणिक कथांमधील पात्रांचे आकर्षण असल्याचे सिद्ध होत आहे, अशी नोंद तज्ज्ञांनी केली आहे.

ऑक्‍सफर्ड बुक स्टोअरतर्फे बुधवारी आयोजित केलेल्या "भारतीय पुराणे आणि कला' या विषयावरील परिसंवादात अनेक कलाकारांनी आपले विचार व्यक्त केले. रामायण व महाभारतातील कथांमध्ये सर्व प्रकारच्या कलांचा उगम आहे. अगदी आदिवासी लोकनृत्यापासून समकालिन कलांचा विचार केला, तर त्या सर्वांचा पाया ही महाकाव्ये असल्याचे दिसते. चित्रकला, नृत्य, संगीत, शिल्पकला अशा कोणत्याही कलेमागील कल्पना महाभारत व रामायणातून घेतलेली असते, असे भरतनाट्यम नृत्यांगना प्रतिभा प्रल्हाद यांनी सांगितले. प्रल्हाद यांनी रामायण व महाभारतावर आधारित अनेक नाटिका सादर केल्या आहेत. ही दोन्ही महाकाव्ये पुराणकथा नसून, जिवंत इतिहास आहे, असे आपल्याला वाटते. मध्य व पूर्व आशियातील आपण सर्व नागरिक या इतिहासात जगत आहोत. देवत्व आपल्यात वसत असून देव व मनुष्य यांचे स्वतंत्र अस्तित्व दाखविणे अशक्‍य आहे, असेही त्या म्हणाल्या.

प्रतिभा प्रल्हाद म्हणाल्या, 'आपल्या पुराणांत असंख्य कथांचा खजिना आहे आणि हा ठेवा पिढ्यानपिढ्या चालत आला आहे. या गोष्टींचा अर्थ आपण वेगवेगळ्या पद्धतीने लावू शकतो आणि प्रेक्षकांसमोर त्याचे सादरीकरणही अनेक प्रकारे करता येते. या कथांमधील पात्रांबाबतही भिन्न मते असतात. काही ठिकाणी रावणाला नायकाच्या रूपात पाहिले जाते. त्याच्या इच्छांमुळे तो राक्षसाप्रमाणे वागला, असा समजही आहे.''

"कलाकार' म्हणजे "कला का आकार'
रामायण, महाभारतातील कथा जशा युगानुयुगे सांगितल्या जातात आणि ऐकल्या जातात तसेच भीम, कृष्ण, हनुमान ही पात्रेही लोकांच्या मनात घर करून आहेत, असे ध्रुपद गायक वसिफुद्दिन डागर म्हणाले. या कथा लोकांसमोर प्रभावीपणे मांडल्याने भूतकाळ आणि भविष्यकाळातील पोकळी साधली जाते. कलावंत हा केवळ "कलाकार' नसून तो "कला का आकार' असतो. काल आणि उद्याला सांधणारा तो पूल असतो.

प्रवाही जीवनाचे मूळ महाभारत आहे. आपल्या अवतीभवती जे घडत असते ते या महाकाव्यातील कथांचे प्रतिबिंब असते. तसे नसते तर या गोष्टींचे अस्तित्व जाणवणार नाही. आपले लोकसंगीतही महाभारत किंवा रामायणातील घटनांशी निगडित आहे.
- अलका रघुवंशी, कला निरीक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com