अन् आठवलेंना स्वतःचेच नाव नाही 'आठवले'

वृत्तसंस्था
मंगळवार, 5 जुलै 2016

शपथ घेत असताना ‘मैं, रामदास बंडू आठवले’ हे म्हणण्याचेच ते विसरले. त्यानंतर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीच आठवलेंना नाव घेण्याची आठवण करून दिली.

नवी दिल्ली - रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांचा आज (मंगळवार) केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. पण, शपथविधीवेळी आठवले चक्क स्वतःचेच नाव विसरले. अखेर राष्ट्रपतींनी त्यांना त्यांच्याच नावाची आठवण करून दिली. 

राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधी कार्यक्रमात आठवलेंनी मंत्रिपदाची शपथही घेतली. पण, शपथ घेत असताना ‘मैं, रामदास बंडू आठवले’ हे म्हणण्याचेच ते विसरले. त्यानंतर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीच आठवलेंना नाव घेण्याची आठवण करून दिली. शपथ वाचतानाही ते वारंवार अडखळत होते व राष्ट्रपती जवळपास प्रत्येक वाक्य वाचत होते. त्यांचे हे अडखळणे नंतर चांगलाच चर्चेचा विषय ठरले. 

शिवशक्ती आणि भीमशक्तीचा नारा देत रामदास आठवले राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत युतीत दाखल झाले. पण, मागील विधानसभा निवडणुकीत रामदास आठवलेंनी शिवसेनेची साथ सोडली आणि भाजपच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला. रामदास आठवलेंची थेट केंद्रीय मंत्रिमंडळात निवड करण्यात आली. आठवले शपथविधीला डोक्यावर निळा फेटा, पिवळा कुर्ता आणि निळा ड्रेस परिधान करून आले होते. आठवले यांनी शपथ घेतल्यानंतर ‘जय भीम, जय भारत’चा जयघोष केला. आठवले जेव्हा व्यासपीठावरून खाली उतरले तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हसून त्यांना दाद दिली.

Web Title: Ramdas Athawale retakes oath after forgetting his name