रामदेवबाबांचे "किम्भो' गुगल स्टोअरमधून गायब 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 1 जून 2018

"किम्भो' हा संस्कृत भाषेतील शब्द असून, एखाद्या व्यक्तीला तुम्ही कसे आहात किंवा तुमच्याकडे नवीन काय? असे विचारण्यासाठी हा शब्द वापरण्यात येतो. पतंजलीच्या उत्पादनांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता या मेसेजिंग ऍपलाही चांगला प्रतिसाद मिळेल, अशी शक्‍यता वर्तविली जात होती; पण तीही अखेर फोल ठरली आहे. 

नवी दिल्ली, ता.31 (वृत्तसंस्था) : योगगुरू रामदेवबाबा यांच्या "पतंजली' उद्योगसमूहाने मोठा गाजावाजा करत लॉंच केलेले "किम्भो' हे मेसेजिंग ऍप एका दिवसातच "गुगल प्ले स्टोअर'मधून गायब झाल्याने नेटिझन्सना मोठा धक्का बसला आहे. "व्हॉट्‌सऍप' आणि फेसबुकसारख्या मोठ्या संकेतस्थळांना टक्कर देण्यासाठी हे ऑनलाइन स्वदेशी वाण रामदेवबाबा आणि त्यांच्या टीमने बाजारात आणले होते. 

"गुगल प्ले स्टोअर'मधून हे ऍप गायब झाल्यानंतर आज अनेकांनी सोशल मीडियावर रामदेवबाबांची खिल्ली उडविली. सध्या "मेसेजिंग ऍप' क्षेत्रामध्ये व्हॉट्‌सऍपचे प्राबल्य आहे. त्यामुळे येथे रामदेवबाबांच्या "किम्भो'चा टिकाव लागणे शक्‍य होणार नसल्याचे "सायबर मीडिया रिसर्च' या संस्थेने म्हटले आहे. या ऍपच्या लॉचिंगनंतर काही तासांमध्ये पाच हजारांपेक्षा अधिक लोकांनी ते डाऊनलोड केले आहे. "स्वदेशी समृद्धी सीमकार्ड'पाठोपाठ रामदेवबाबांनी स्वदेशी मेसेजिंग ऍप लॉंच करण्याचा निर्णय घेतला होता. स्वदेशी सीमकार्डच्या लॉचिंगसाठी रामदेवबाबांच्या पतंजली उद्योगसमूहाने "भारत संचार निगम लिमिटेड'सोबत (बीएसएनएल) करार केला आहे. 

"त्या' शब्दाचा अर्थ 
"किम्भो' हा संस्कृत भाषेतील शब्द असून, एखाद्या व्यक्तीला तुम्ही कसे आहात किंवा तुमच्याकडे नवीन काय? असे विचारण्यासाठी हा शब्द वापरण्यात येतो. पतंजलीच्या उत्पादनांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता या मेसेजिंग ऍपलाही चांगला प्रतिसाद मिळेल, अशी शक्‍यता वर्तविली जात होती; पण तीही अखेर फोल ठरली आहे. 

Web Title: Ramdev Baba's "Kimbo" disappeared from Google store