
मानवतेचे जातीवरून विभाजन नको; राष्ट्रपती रामनाथ कोविंद
पुरी, (ओडिशा) : भारतीय संस्कृतीत गरजूंची सेवा करण्यास नेहमीच प्राधान्य दिले आहे. त्यामुळे, मानवता आणि सत्याची जात, लिंग किंवा धर्मावरून विभागणी केली जाऊ शकत नाही, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांनी आज केले. येथील गौडिया मठाचे संस्थापक श्रीमद् भक्ती सिद्धांत सरस्वती गोस्वामी प्रभूपाद यांच्या १५० व्या जयंती सोहळ्याचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
राष्ट्रपती कोविंद पुढे म्हणाले, की भारतातील विविध भागांत वेगवेगळ्या धार्मिक परंपरा आणि प्रथा आहेत. मात्र, संपूर्ण मानवजातीला एक कुटुंब समजून सर्वांच्या कल्याणासाठी काम करणारी एक श्रद्धाही आहे. आपल्या संस्कृतीत गरजूंची सेवा करण्याला नेहमीच प्राधान्य दिले आहे. मानवता आणि सत्य ही सर्वोच्च मूल्ये असून त्यांची विभागणी केली जाऊ शकत नाही. समाजाचे कल्याण हेच अंतिम ध्येय आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
ते पुढे म्हणाले, की आपल्या देशात अनेक संतांनी नि:स्वार्थ उपासना केली. अशा संतांमध्ये चैतन्य महाप्रभूंचे स्थान महत्त्वाचे आहे. त्यांच्या असामान्य समपर्णपासून प्रेरणा घेत अनेकजणांनी भक्तीमार्गाची निवड केली. लोकांनी स्वत:ला गवतापेक्षाही लहान समजत नम्र वृत्तीने ईश्वराचे स्मरण करावे, असे चैतन्य महाप्रभू म्हणत असत. ईश्वराबद्दलचे सातत्यपूर्ण प्रेम आणि समाजाला समानतेच्या धाग्यातून जोडण्याच्या वृत्तीने चैतन्य महाप्रभूंना भारतीय संस्कृती व इतिहासात अद्वितीय प्रतिष्ठा मिळाली. आपण झाडांपेक्षाही सहनशील असायला हवे. तसेच अहंकाराची भावना नसावी तसेच इतरांप्रति आदरभाव असावा. चैतन्य महाप्रभूंचा संदेशाचा जगभरात प्रसार करण्याच्या निश्चयात गौडिया मिशनला यश मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कोरोना साथीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याबद्दलही त्यांनी डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
वडिलांच्या स्वाक्षरीने राष्ट्रपती भारावले
राष्ट्रपती रामनाथ कोविंद व त्यांच्या पत्नी सविता कोविंद यांनी ओडिशातील जगन्नाथ मंदिरात पूजाअर्चा केली. या १२ व्या शतकातील मंदिराच्या पुजाऱ्याने राष्ट्रपतींना रजिस्टरमध्ये त्यांच्या वडिलांची स्वाक्षरी दाखवली. ती पाहून राष्ट्रपती भारावून गेले, अशी माहिती पुजाऱ्याने वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
सध्याच्या जात, धर्म, लिंग आदींवर आधारित भेदभावापेक्षा भक्तिमार्ग श्रेष्ठ दर्जाचा आहे. भक्तिमार्गाचे वैशिष्ट्य म्हणजे ईश्वराप्रति संपूर्ण समर्पण. ते केवळ अध्यात्मिकच नव्हे तर प्रत्येक व्यक्तीच्या दैनंदिन जीवनातही दिसून येते. शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक यांनीही भक्तीमार्गावरून चालताना समतावादी समाजाच्या निर्मितीसाठी प्रयत्न केले.
- रामनाथ कोविंद, राष्ट्रपती
Web Title: Ramnath Kovind Religion Not Partition
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..