‘इंडिया फर्स्ट’बाबत मौन का?

‘इंडिया फर्स्ट’बाबत मौन का?

नवी दिल्ली - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी आज ट्विटच्या माध्यमातून सरकारला धारेवर धरले. भारत- अमेरिका व्यापार, एच-१ बी व्हिसा, राष्ट्रीय सुरक्षा, तेलाच्या किंमती आणि  स्टील निर्यात आदींबाबत  पंतप्रधान गप्प का आहेत? असा सवाल सुरजेवाला यांनी केला.

डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘अमेरिका फर्स्ट’चा नारा दिला असताना आपले पंतप्रधान ‘इंडिया फर्स्ट’बाबत गप्प का आहेत? असा सवाल करतानाच रणदीप सुरजेवाला यांनी ट्रम्प प्रशासनाने वाढविलेले आयातशुल्क आणि त्याचा स्टील उद्योगावर झालेला परिणाम याचा उल्लेख केला आहे.

दिल्लीत कडेकोट बंदोबस्त
ट्रम्प यांचे वास्तव्य असणाऱ्या हॉटेल आयटीसी मौर्यभोवती कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून भारतीय आणि अमेरिका अशा दोन्ही देशांच्या गुप्तचर यंत्रणा संयुक्तपणे हे काम करत आहेत. ड्रोनविरोधी एनएसजीची यंत्रणा, स्नायपर्स, स्वात कमांडो, काईट कॅचर, श्‍वान पथके, शार्प शूटर यांच्याबरोबरच पराक्रम पथकाच्या विशेष गाड्याही ट्रम्प यांच्या मार्गावर तैनात करण्यात आल्या आहेत. सहा जिल्ह्यांतील पोलिस तुकड्या दिल्लीत तैनात करण्यात आल्या असून केंद्रीय पोलिस दलांच्या चाळीस तुकड्यांना थेट कृतीसाठी तैनात करण्यात आले आहे. सरदार पटेलमार्गावरील आयटीसी मौर्य हॉटेलमध्ये चोवीस तास सीसीटीव्ही वॉच आहे.

ट्रम्प बनले बाहुबली
डोनाल्ड ट्रम्प यांनी आज बाहुबली थीमवर तयार करण्यात आलेला व्हिडिओ रिट्विट केला. यामध्ये ट्रम्प यांना अमरेंद्र बाहुबलीच्या रूपात दाखविण्यात आले आहे. हा व्हिडिओ ८१ सेकंदांचा असून, यामध्ये ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया, मुलगी इव्हांका आणि त्यांचे पुत्र ज्युनिअर ट्रम्प यांनाही दाखविण्यात आले आहे. हा व्हिडिओ रिट्विट करताना ट्रम्प यांनी भारतातील मित्रांना भेटण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले आहे.

हॉटेलात शाही बडदास्त
दिल्लीतील हॉटेल आयटीसी मौर्यमध्ये ट्रम्प यांच्यासाठी शाही बडदास्त ठेवण्यात आली असून अलिशान खासगी स्पा बरोबरच फूड टेस्टिंग लॅबही येथे थाटण्यात आली आहे. या हॉटेलातील आलिशान खोलीमध्ये ट्रम्प यांचे वास्तव्य असेल. पाहुण्यांना स्वच्छ हवा मिळावी म्हणून विशेष यंत्रणाही हॉटेलात तयार ठेवण्यात आली आहे. हॉटेलातील चाणक्य नावाचा प्रेसेडेन्शियल सूट ट्रम्प यांच्यासाठी राखून ठेवण्यात आला आहे. कधीकाळी याच सूटमध्ये अमेरिकेचे माजी अध्यक्ष जिमी कार्टर, बिल क्लिंटन आणि जॉर्ज डब्लू बुश यांचेही वास्तव्य होते.

साबरमती आश्रमात तयारी पूर्ण
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील साबरमती आश्रमात सध्या जोरदार तयारी सुरू आहे. ट्रम्प यांच्या या आश्रमभेटीबाबत अनिश्‍चितता असली तरीसुद्धा आश्रमाच्या व्यवस्थापनाने मात्र तयारीला वेग दिला आहे. या आश्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे कटआऊटदेखील लावण्यात आले असून जिथे महात्मा गांधी आणि कस्तुरबा यांचे वास्तव्य होते त्या घराचीही रंगरंगोटी करण्यात आली आहे. सरकारी पातळीवरून या दौऱ्याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. 

अहमदाबाददेखील सज्ज
अहमदाबाद शहरामध्ये मोदी आणि ट्रम्प यांचा रोड शो होणार असल्याने त्यासाठी विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. येथील स्टेडियममध्येच नमस्ते ट्रम्प या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प हे दोघेही सहभागी होतील. रोड शोच्या मार्गावर ट्रम्प यांच्या स्वागतासाठी एक लाख लोक उभे असतील, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. महापालिकेकडून या मार्गावर साफसफाईला जोर आला असून रस्ते पाणी टाकून स्वच्छ धुतले जात अाहेत. 

संस्कृतीचे दर्शन घडणार
या रोड शोमध्ये हॅलो अहमदाबाद हा खास कार्यक्रम असेल त्या माध्यमातून पाहुण्यांना भारतीय संस्कृती आणि वैविध्याचे विशेष दर्शन घडेल. देशभरातील सर्वच राज्यांच्या कलाकारांना त्यांच्या कला सादर करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. प्रत्येक राज्यासाठी वेगळे स्टेज असेल. रोड शो आटोपल्यानंतर हे दोघेही मोटेरा स्टेडियममध्ये आयोजित कार्यक्रमाला उपस्थिती लावतील. मोदी आणि ट्रम्प यांच्या संयुक्त संबोधनापूर्वी सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले असून कैलाश खेर आणि अन्य कलाकार व गायक सादरीकरण करतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com