‘राष्ट्रीय जनता दला’कडून नितीश यांना मैत्रीची साद

काँग्रेसही अनुकूल, पाटण्यात जोरबैठका
Nitish-Kumar
Nitish-Kumaresakal

पाटणा : बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे संयुक्त जनता दल (जेडीयू) भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रीय जनता दलासोबत (आरजेडी) हातमिळवणी करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ‘नितीश हे भाजपला सोडचिठ्ठी द्यायला तयार असतील तर आम्ही त्यांच्याशी हातमिळवणी करण्याचा विचार नक्कीच करू,’ असे राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) उपाध्यक्ष शिवानंद तिवारी यांनी म्हटले आहे. काँग्रेसनेही नितीश यांच्याशी पुन्हा मैत्री करण्यासाठी अनुकूलता दर्शविल्याने राज्यातील राजकीय समीकरणे बदलू शकतात.

नितीश यांनी ‘जेडीयू’च्या सगळ्या आमदार आणि खासदारांना पुढील दोन दिवसांमध्ये पाटण्यात येण्याचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे ‘आरजेडी’ने देखील त्यांच्या आमदारांना राजधानीत एकत्र येण्यास सांगितले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीशकुमार यांनी दूरध्वनीवरून काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी संवाद साधल्याचे समजते. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव हे उद्याच (ता.९) त्यांच्या आमदारांशी संवाद साधणार आहेत. ‘राज्यातील दोन्ही प्रमुख पक्षांनी मंगळवारी आपआपल्या आमदारांच्या बैठकांचे आयोजन केले असून त्यावरूनच सगळे काही लक्षात येते.

राज्यातील राजकीय परिस्थिती बदलत असल्याचे त्यातून दिसून येते,’ असे तिवारी यांनी नमूद केले. नितीशकुमार यांना सोबत घेण्यासाठी राष्ट्रीय जनता दलाने याआधी त्यांनी केलेले आरोप देखील विसरण्याची तयारी दर्शविली आहे. ‘नितीश आमच्यासोबत आले तर आम्ही नक्कीच त्यांची गळाभेट घेऊ. भाजप सध्या बेलगामपणे वागतो आहे, त्यांच्यापासून राज्यघटनेला धोका निर्माण झाला आहे त्यामुळे नितीशकुमार आमच्यासोबत आले तर त्यांचे नक्कीच स्वागत करू,’ असे तिवारी यांनी सांगितले.

अशीही नाराजी

  • कोविंद यांच्या निरोप समारंभाला अनुपस्थिती

  • राष्ट्रपती मुर्मू यांच्या शपथविधीलाही गैरहजर

  • नीती आयोगाच्या महत्त्वपूर्ण बैठकीलाही दांडी

  • जातीनिहाय जनगणनेवरून आक्रमक भूमिका

भाजपचे ‘वेट अँड वॉच’

या सगळ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांनी मात्र ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि अन्य बड्या नेत्यांनी पंधरा दिवसांपूर्वीच बिहारचा दौरा करत येथील परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. भाजपचे स्थानिक नेतेही उघडपणे नितीश यांच्याविरोधात बोलणे टाळत आहेत.

नितीशकुमार यांनी माझ्यावर टीका करण्यापेक्षा आधी भाजपशी दोन हात करून दाखवावेत. माझ्यापेक्षा त्यांना त्यांच्याच जवळच्या मित्रांपासून मोठा धोका आहे. नितीश यांनी माजी अध्यक्ष आरसीपी सिंह यांचा अवमान केला असून याआधी त्यांनी शरद यादव आणि जॉर्ज फर्नांडिस यांनाही अवमानित केले होते.

चिराग पासवान,प्रमुख लोकजनशक्ती पक्ष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com