रतन टाटा- भागवत एकाच मंचावर येणार

पीटीआय
बुधवार, 11 जुलै 2018

गेल्या महिन्यात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता.

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघाचालक मोहन भागवत आणि उद्योगपती रतन टाटा पुढील महिन्यात एकाच मंचावर येत आहेत. नाना पालकर स्मृती समितीच्या वतीने हा कार्यक्रम 24 ऑगस्टला मुंबईत होत आहे. 

गेल्या महिन्यात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता. संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाना पालकर स्मृती समितीच्या वतीने हा कार्यक्रम 24 ऑगस्टला आयोजित करण्यात आला आहे. माटुंग्यातील यशवंत नाट्य मंदिरात हा कार्यक्रम होत आहे. संघाचे प्रचारक नाना पालकर यांच्या स्मरणार्थ ही स्वयंसेवी संस्था स्थापन झाली आहे. टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या आवारात समितीचे कार्यालय असून, ही समिती कर्करुग्णांना मदत करते. 

टाटा ट्रस्टच्या प्रवक्‍त्याने या विषयावर अधिक बोलण्यास नकार दिला. रतन टाटा एखाद्या कार्यक्रमाला उपस्थित राहत असतील, तर तो त्यांचा खासगी विषय आहे, असे प्रवक्‍त्याने स्पष्ट केले. याआधी 29 डिसेंबर 2016 रोजी रतन टाटा यांनी नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला अचानक भेट दिली होती. 

Web Title: Ratan Tata and Bhagwat will be on the same stage soon