सक्‍सेनाच्या पैशावर रतुल पुरीची मौज

पीटीआय
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

अशी वळविली संपत्ती
पुरीने बॅंकेच्या कर्जाची रक्कम मोसेर बायर या कंपनीच्या अन्य उपकंपन्यांकडे हस्तांतरित केल्याचे उघड झाले आहे, पुढे याच रकमेचे रूपांतर हे अन्य कर्जे आणि गुंतवणुकीमध्ये करण्यात आले. हवाला ऑपरेटर आणि कार्पोरेट क्षेत्रातील मध्यस्थांच्या माध्यमातून त्याने ही रक्कम कारखाने आणि अन्य चल संपत्ती खरेदी करण्यासाठी वापरली. दुबईतील हवाला ऑपरेटर राजीव सक्‍सेना याच्या क्रेडिट कार्डवर त्याने आलिशान जीवनशैलीचा उपभोगही घेतला, असे ‘ईडी’ने म्हटले आहे. हाच राजीव सक्‍सेना हा ऑगस्टा वेस्टलॅंड हेलिकॉप्टर खरेदीतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी आहे.

नवी दिल्ली - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा भाचा रतुल पुरीने त्याच्या आलिशान जीवनशैलीसाठी चक्क दुबईमधील हवाला ऑपरेटरच्या क्रेडिट कार्डचा वापर केल्याचे उघड झाले आहे. या पैशाचा वापर करत त्याने जगभर खासगी विमानांतून प्रवास केला, अनेक नाईट क्‍लबलाही भेटी दिल्याचे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आरोपपत्रामध्ये म्हटले आहे. बॅंक कर्ज आणि हवाला व्यवहारप्रकरणी ‘ईडी’ने आरोपपत्र सादर केले असून, या गैरव्यवहाराची व्याप्ती तब्बल आठ हजार कोटी रुपये एवढी आहे. रतुल पुरी हा अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठीच्या हेलिकॉप्टर खरेदी गैरव्यवहारातही आरोपी आहे.

या गैरव्यवहाराच्या अनुषंगाने ‘ईडी’ने आज पुरी आणि त्याचे सहकारी, तसेच मोसेर बायर इंडिया लि. या कंपनीविरोधात विशेष न्यायालयामध्ये आरोपपत्र सादर केले आहे. रतुलचे वडीलच ‘मोसेर बायर’ या कंपनीचे प्रवर्तक असल्याचे उघड झाले आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील गुन्हेगारीविषयक तरतुदीअंतर्गत हा खटला दाखल करण्यात आला असून, तब्बल आठ हजार कोटी रुपयांच्या बॅंक कर्जाचा बेकायदा वापर केल्याचा आरोप या सर्व आरोपींवर ठेवण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ratul Puri Money