... तोपर्यंत गायकवाड यांना तिकिट नाहीच: एअर इंडिया

वृत्तसंस्था
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

एका 60 वर्षीय कर्मचाऱ्यास मारहाण करुन, विमानाखाली टाकून देण्याची धमकी देणाऱ्या गायकवाड यांना कोणत्याही प्रकारचे शासन झाल्याशिवाय पुन्हा एकदा हवाई प्रवासाची परवानगी देणे अत्यंत लज्जास्पद ठरेल

नवी दिल्ली - एअर इंडियाच्या वरिष्ठ कर्मचाऱ्यास मारहाण केल्याप्रकरणी अडचणीत आलेल्या खासदार रवींद्र गायकवाड यांचा हवाई प्रवासासाठी एअर इंडिया कंपनीचे तिकिट काढण्याचा आणखी एक प्रयत्नही अपयशी ठरला आहे.

गायकवाड यांनी या प्रकरणी संसदेमध्ये निवेदन दिले आहे. मात्र एअर इंडियाची माफी मागण्यास गायकवाड यांनी स्पष्ट नकार दिला होता. या पार्श्‍वभूमीवर, गायकवाड यांच्यावर लादलेली बंदी उठविण्यासंदर्भात एअर इंडियानेही कोणतेही पाऊल उचलेले नाही. याचबरोबर, केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाकडूनही गायकवाड यांच्यावरील बंदी उठविण्यासंदर्भातील कोणतेही निर्देश एअर इंडियास मिळाले नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

गायकवाड यांनी दिल्ली-मुंबई व मुंबई-दिल्ली अशा मार्गांसाठी दोन तिकिटे आरक्षित केली होती. परंतु एअर इंडियाने तत्परतेने ही तिकिटे "ब्लॉक' केल्याचे निष्पन्न झाले आहे. ""रवींद्र गायकवाड हे धोकादायक प्रवासी आहेत. यामुळे ते बिनशर्त शरणागती पत्करत नाहीत; तोपर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर हवाई प्रवास करु शकत नाही. एका 60 वर्षीय कर्मचाऱ्यास मारहाण करुन, विमानाखाली टाकून देण्याची धमकी देणाऱ्या गायकवाड यांना कोणत्याही प्रकारचे शासन झाल्याशिवाय पुन्हा एकदा हवाई प्रवासाची परवानगी देणे अत्यंत लज्जास्पद ठरेल,'' अशी स्पष्ट भूमिका एअर इंडियाच्या कर्मचारी संघटनेने घेतली आहे.

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यास मारहाण केल्यानंतर गायकवाड यांनी एअर इंडियाच्या विमानाने प्रवास करण्याचे केलेले सर्व प्रयत्न अपयशी ठरले आहेत. अपमानित गायकवाड यांना संसदेच्या अधिवेशनासाठी पुण्यावरुन रेल्वेने दिल्लीस जावे लागले होते. या पार्श्‍वभूमीवर, या प्रकरणामधील तणाव अधिक वाढल्याचे निष्पन्न झाले आहे. गायकवाड यांचा पक्ष असलेल्या शिवसेना व केंद्र सरकारची या प्रकरणासंदर्भातील भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

दरम्यान "जर हे प्रकरण 10 एप्रिलपर्यंत मिटले तरच आम्ही एनडीएच्या भोजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू', असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Ravindra Gaikwad blocked by AI again