रवींद्र गायकवाड पुन्हा विमान प्रवास करू शकणार..! 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

'एअर इंडिया'ची माफी मागितल्याशिवाय ही बंदी उठविणार नाही, अशी भूमिका विमान कंपन्यांनी घेतली होती. मात्र, गायकवाड यांनी अशी माफी मागितली नसतानाही केंद्र सरकारने त्यांच्यावरील बंदी उठविण्याचे आदेश दिले. 'प्रवाशांची सुरक्षितता' हाच मुद्दा केंद्रस्थानी ठेवत विमान कंपन्यांनी गायकवाड यांच्यावर बंदी घातली होती. 

नवी दिल्ली : 'एअर इंडिया'च्या कर्मचाऱ्याला मारहाण करणारे शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर विमान कंपन्यांनी घातलेली बंदी उठविण्याचे आदेश केंद्र सरकारने आज (शुक्रवार) दिले. 'एअर इंडिया'सह इतर विमान कंपन्यांनी या आदेशाची अंमलबजावणी केली असल्याने आता पुन्हा विमानप्रवास करण्याचा गायकवाड यांचा मार्ग मोकळा झाला आहे. 

दोन आठवड्यांपूर्वी रवींद्र गायकवाड यांनी 'एअर इंडिया'च्या कर्मचाऱ्याला चपलेने मारहाण केली होती. विमान प्रवाशांच्या सुरक्षेसाठी असलेल्या नियमांचे उल्लंघन त्यांनी केल्यामुळे गायकवाड यांच्यावर 'एअर इंडिया'ने बंदी घातली होती. इतर विमान कंपन्यांनीही याचे अनुकरण केले. त्यामुळे रवींद्र गायकवाड यांना विमान प्रवास करता येत नव्हता. या प्रकरणी शिवसेनेने काल (गुरुवार) लोकसभेमध्येच गदारोळ घालून केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनाच घेराव घातला होता. त्यानंतर गायकवाड यांनी त्या वर्तनाविषयी खेदही व्यक्त केला होता. 

'एअर इंडिया'ची माफी मागितल्याशिवाय ही बंदी उठविणार नाही, अशी भूमिका विमान कंपन्यांनी घेतली होती. मात्र, गायकवाड यांनी अशी माफी मागितली नसतानाही केंद्र सरकारने त्यांच्यावरील बंदी उठविण्याचे आदेश दिले. 'प्रवाशांची सुरक्षितता' हाच मुद्दा केंद्रस्थानी ठेवत विमान कंपन्यांनी गायकवाड यांच्यावर बंदी घातली होती. 

विशेष म्हणजे, 'गायकवाड यांच्यावरील बंदी मागे घेतली नाही, तर मुंबईतून विमानांचे उड्डाण करू देणार नाही' असा इशारा शिवसेनेच्या खासदारांनी दिला होता. तसेच, राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या भोजनाच्या कार्यक्रमावरही बहिष्कार घालण्याचा इशारा त्यांनी दिला होता. 

Web Title: Ravindra Gaikwad can fly again; Air India lifts ban on Shiv Sena MP