दिल्ली विमानतळावर बॅगेत आरडीएक्स आढळल्याने खळबळ

वृत्तसंस्था
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल 3 वर आज (शुक्रवार) एक संशयास्पद बॅग आढळली असून, त्यामध्ये आरडीएक्स मिळाले आहे. सुरक्षा दलाच्या जवानांनी बॅग ताब्यात घेतली आहे.

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल 3 वर आज (शुक्रवार) एक संशयास्पद बॅग आढळली असून, त्यामध्ये आरडीएक्स मिळाले आहे. सुरक्षा दलाच्या जवानांनी बॅग ताब्यात घेतली आहे. या घटनेनंतर विमानतळ आणि परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळावरील पोलिस स्थानकात शुक्रवारी रात्री एकच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने फोन केला. यावेळी त्याने टर्मिनल 3 वरील पिलर नंबर 4 च्या प्रवेशद्वारा जवळ संशयास्पद बॅग असल्याची माहिती दिली. पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये आरडीएक्स सापडले. आरडीएक्स सापडल्यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण विमानतळाची तपासणी सुरु केली आहे.

दरम्यान, विमान तळाचा परिसर सुरक्षा दलाने ताब्यात घेतला असून, कसून तपासणी केली जात आहे. परिसरामध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. शिवाय, विमानतळावरील प्रवासी आणि गाड्यांची वाहतूक थांबवण्यात आली होती. देशातील अत्यंत महत्त्वाच्या अशा विमानतळावर संशयास्पद बॅग सापडल्याने प्रवाशांमध्ये देखील खळबळ उडाली. या घटनेनंतर काही काळासाठी टर्मिनल 3 च्या समोरील रस्ता बंद करण्यात आला होता. शिवाय, प्रवाशांना टर्मिनल 3च्या बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली होती. पोलिस पुढील तपास करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RDX found in suspicious bag at Delhi airport security beefed up