1 रुपयाचा दंड भरा किंवा वकीली सोडा; प्रशांत भूषण यांना न्यायालयाने सुनावली शिक्षा

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 31 August 2020

जेष्ठ वकील आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भूषण यांना दोन ट्विट करुन सरन्यायाधीश शरद बोबडे आणि न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने १ रुपयाचा दंड ठोठावला आहे

नवी दिल्ली- जेष्ठ वकील आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भूषण यांना दोन ट्विट करुन सरन्यायाधीश शरद बोबडे आणि न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने १ रुपयाचा दंड ठोठावला आहे. प्रशांत भूषण यांना १५ सप्टेंबरपर्यंत दंड भरण्याची मुदत देण्यात आली आहे. हा दंड न भरल्यास भूषण यांना 3 महिन्यांची शिक्षा आणि त्यांच्या 3 वर्षे वकीली करण्यावरही बंदी येऊ शकते. 

63 वर्षीय प्रशांत भूषण यांनी न्यायालयाची बिनशर्त माफी मागण्यास नकार दिला होता. माझी वक्तव्ये ही सद्भावनापूर्ण होती आणि जर मी माफी मागितली, तर माझा स्वाभिमान आणि ज्या व्यवस्थेवर सर्वाधिक विश्वास आहे, त्या व्यवस्थेचा अपमान होईल, असे भूषण यांनी म्हणाले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने २४ तारखेला आपला निकाल राखून ठेवला होता. 

विजय मल्ल्याला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; अवमान प्रकरणातील याचिका फेटाळली

भूषण यांनी दोन ट्विट करत सरन्यायाधीश शरद बोबडे आणि सर्वोच्च न्यायालयाचे शेवटचे तीन न्यायाधीश यांच्यावर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात अवमानाचा खटला सुरु होता. न्यायालयाने भूषण यांना माफी मागण्याची संधी दिली होती. यासाठी त्यांना विचार करण्यासाठी ३ दिवसांचा वेळही देण्यात आला होता. मात्र, भूषण यांनी आपली वक्तव्य मागे घेण्यास नकार दिला. माझ्या मनात सर्वोच्च न्यायालयाबद्दल सर्वात जास्त आदर आहे. सर्वोच्च न्यायालय किंवा कोणत्याही सरन्यायाधीशाची बदनामी करण्यासाठी मी हे ट्विट केले नाही, उलट ते माझे कर्तव्य आहे. माझी टीका ही रचनात्मक, घटनेचे रक्षण होईल आणि लोकांच्या अधिकाराला पूरक अशी आहे. तसेच ती सर्वोच्च न्यायालय व्यवस्थेची दिशाभूल होण्यापासून रोखण्यासाठीही आहे, असं स्पष्टीकरण त्यांनी त्यावेळी दिलं होतं.

भारताचे महान्यायवादी के.के. वेणुगोपाल यांनीही प्रशांत भूषण यांमा समन्स देऊन माफ करण्याची विनंती केली होती. मात्र, न्यायालयाने त्यास नकार दिला. ज्या व्यक्तीला आपल्या चुकीची जाणीव नाही, त्याला कशाप्रकारे माफ केले जाऊ शकते, असा प्रश्न न्यायालायने केला होता. न्यायालयाने आज (३१ ऑगस्ट) भूषण यांना शिक्षा ठोठावली आहे. १५ सप्टेंबरपर्यंत १ रुपयाचा दंड भरा किंवा तीन महिन्यांचा तुरुंगवास आणि तीन वर्षांपर्यंत वकीली करणे सोडा, अशी शिक्षा न्यायालयाने सुनावणी आहे. 

दरम्यान, भूषण यांच्यावर २००९ सालच्या न्यायालयाच्या अवमानप्रकरणी आणखी एक खटला सुरु आहे. १० सप्टेंबरला याबाबतची सुनावणी होणार आहे.

(edited by- kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Re 1 Fine Or No Practice For 3 Years Supreme Court To Prashant Bhushan