कर्नाटकातील बंडखोर आमदार साईचरणी; विमानतळाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शने

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जुलै 2019

भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांच्या शिर्डीभेटीची शाही व्यवस्था केली होती. काकडी येथील शिर्डी विमानतळाबाहेर युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे फडकावून या आमदारांचा निषेध केला.

शिर्डी : कर्नाटकातील जेडीएस व काँग्रेसचे संयुक्त सरकार पाडण्यासाठी आपल्या आमदारकीचे राजीनामे देऊन बंडाचे निशाण फडकावणाऱ्या तेरा आमदारांनी आज (शनिवार) शिर्डी येथे येऊन साईचरणी माथा टेकला. "आमची आमदारकी शाबूत राहू दे. कर्नाटकात सत्तांतर होऊन आमची मनोकामना पूर्ण होऊ दे,'' अशी मनोकामना त्यांनी या वेळी व्यक्त केली. 

भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांच्या शिर्डीभेटीची शाही व्यवस्था केली होती. काकडी येथील शिर्डी विमानतळाबाहेर युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे फडकावून या आमदारांचा निषेध केला. तसेच केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. कडेकोट पोलिस बंदोबस्तात ही भेट पार पडली. 

राजीनामा दिलेल्या या आमदारांना अपात्र ठरविण्याबाबत कर्नाटक विधानसभा अध्यक्षांकडे याचिका दाखल करण्यात आली आहे. त्याच वेळी आपणहून बहुमत सिद्ध करण्याची तयारी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी दाखविली आहे. सर्वोच्च न्यायालयाने येत्या मंगळवारपर्यंत तेथील राजकीय परिस्थिती 'जैसे थे' ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या सर्व नाट्यमय घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर आमदारकी पणाला लावलेल्या या बंडखोर आमदारांनी साईंचे आशीर्वाद घेतले. या भेटीप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या पत्रकारांसोबत बोलण्यास त्यांनी असमर्थता व्यक्त केली. 

दुपारी एकच्या सुमारास रिलायन्स कंपनीच्या एका खास विमानाने या तेरा आमदारांचे शिर्डी विमानतळावर आगमन झाले. त्यांचे विमान येथे उतरण्यापूर्वी त्यांची व्यवस्था सांभाळणाऱ्या पथकाला घेऊन येणारे दुसरे विमान येथे येऊन दाखल झाले होते. विमानातून उतरल्यानंतर एका वातानुकूलित आरामबसने हे सर्व आमदार साईमंदिराकडे रवाना झाले.

त्यांच्या साईदर्शनाची जबाबदारी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिन तांबे यांच्यावर सोपविण्यात आली होती. दिल्ली व मुंबईतील भाजपचे वरिष्ठ नेते मोबाईलवरून त्यांच्या येथील भेटीची माहिती सतत घेत होते. अप्पर पोलिस अधीक्षक रोहीदास पवार व पोलिस उपाधिक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्यासह सुमारे पन्नास पोलिसांचा बंदोबस्त या वेळी तैनात होता. 

साईमंदिरात कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर व भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सचिन तांबे यांनी या सर्वांचे स्वागत केले. शाल श्रीफळ व साईबाबांची संगमरवरी मूर्ती भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The rebel MLA of Karnataka came to Shirdi for Darshan of Saibaba