कर्नाटकातील काँग्रेसमधील बंड होणार थंड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 डिसेंबर 2018

बंगळूर - मंत्रिमंडळ विस्तारावरून काँग्रेस आमदारांत निर्माण झालेला असंतोष काहीसा शांत होण्याच्या मार्गावर आहे. नाराज ज्येष्ठ आमदार रामलिंगा रेड्डी, भीमा नायक, सुधाकर यांच्यासह काही आमदारांशी समन्वय समितीचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी केलेली मध्यस्थी यशस्वी झाली आहे. त्यामुळे दोन दिवसात सर्व काही सुरळीत होईल, असा विश्वास काँग्रेसच्या सूत्रांनी व्यक्त केला.

सिध्दरामय्या यांच्या निवासस्थानी माजी मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी मंगळवारी (ता.२५) सकाळी चर्चा केली. यावेळी रेड्डी यांनी आपली नाराजी स्पष्ट केली. सिध्दरामय्या यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. युती सरकारमध्ये सर्वांना योग्य स्थान देणे शक्‍य झाले नाही, परंतु पुढील काही दिवसांत सर्व सुरळीत होईल, असा त्यांनी विश्वास दिला.

रामलिंगा रेड्डी यांचे समर्थक गेले दोन दिवस निदर्शने करीत होते. काही नगरसेवकांनी सामूहिक राजीनामा देण्याचा इशाराही दिला. आज चर्चा सफल झाल्याने कोणीही राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. मंत्रिपदासाठी इच्छुक असलेले आमदार सुधाकर, भीमा नायक यांनीही सिध्दरामय्या यांच्याशी चर्चा केली. त्यांचे मनपरिवर्तन करण्यात सिध्दरामय्या यांना यश आले. अन्य काही असंतुष्ट आमदारांशी सिध्दरामय्या यांनी दूरध्वनीवर चर्चा केली. पुन्हा मतभेद होणार नाहीत यादृष्टीने नेत्यांनी प्रयत्न चालविले आहेत.

आमदार आनंदसिंग यांच्याशी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी चर्चा केली. बळ्ळारी येथील जिंदाल स्टील फॅक्‍टरीजवळील विमानतळावर उभयतांची भेट झाली. यावेळी झालेल्या चर्चेतून आनंदसिंग यांचे समाधान झाल्याचे सांगण्यात आले.

जारकीहोळी मवाळ
रविवारी (ता.२४) आपल्या राजीनाम्यावर ठाम असलेले माजी मंत्री रमेश जारकीहोळी आज काहीसे मवाळ बनले होते. ते त्यांचे बंधू व मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे समजते. दरम्यान, मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सतीश जारकीहोळी प्रथमच बेळगावला गेले. यावेळी पत्रकारांशी बोलताना पक्षातील कोणीही आमदार राजीनामा देणार नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रमेश जारकीहोळींशी चर्चा करून मार्ग काढण्यात येईल, असे ते म्हणाले.

Web Title: Rebellion in Karnataka congress follow up