गरीब- श्रीमंतांमधील दरी नोटाबंदीमुळे कमी होणार - राजनाथसिंह

पीटीआय
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

नोटाबंदीचा निर्णय ऐतिहासिक आणि धाडसी असून, राष्ट्रहिताचा आहे. दहशतवाद, मूलतत्त्ववाद आणि नक्षलवादाला याचा फटका बसेल. राजकारणाचा नव्हे, तर समाज आणि देशाच्या उभारणीचा विचार करणाऱ्या व्यक्तींकडूनच असे निर्णय घेतले जातात.
- राजनाथसिंह, केंद्रीय गृहमंत्री

नवी दिल्ली - पाचशे व हजारच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयामुळे राजकीय आणि प्रशासकीय कामामध्ये प्रामाणिकपणा येऊन गरीब आणि श्रीमंतांमधील दरी कमी होईल, असा विश्‍वास केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी शनिवारी व्यक्त केला.

ते म्हणाले, ""नोटाबंदीच्या निर्णयामुळे नागरिकांना काही प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. हा त्रास थोडा काळच सहन करावा लागेल, कारण सरकार पूर्ण क्षमतेने स्थिती पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करीत आहे. भ्रष्टाचारी आणि दहशतवाद्यांचे आर्थिक स्रोत या निर्णयामुळे बंद होतील. यामुळे राजकीय आणि प्रशासकीय कामांमध्ये प्रामाणिकपणा वाढणार आहे. तसेच, गरीब आणि श्रीमंतांमधील दरी कमी होण्यास मदत होईल. भ्रष्टाचार, काळा पैसा आणि दहशतवादाला आळा घालण्यासाठी सरकारने नोटाबंदी केली.''

Web Title: reduce the gap between the poor & rich by currency ban