धर्मग्रंथ वाचण्यास नकार दिल्याने नातेवाईकांनी केली मुलीची हत्या

वृत्तसंस्था
रविवार, 17 जून 2018

धर्मग्रंथ वाचणे आणि प्रार्थना करण्याच्या कारणावरून त्या मुलीचे काका-काकू चांगलेच संतापले होते. या संतापाच्या भरातच 4 मेला मुलीच्या काका आणि काकूने ओढणीच्या सहाय्याने तिचा गळा आवळून खून केला होता.

मुंबई : धर्मग्रंथ वाचण्यास नकार दिल्याने एका 15 वर्षीय मुलीची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. मुलीच्या नातेवाईकांनीच तिची हत्या केली आहे, अशी माहिती पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयात दिली. ही घटना मुंबईतील अँटॉप हिल येथे घडली.  

न्यायमूर्ती आर. एम. सावंत आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणाची सुनावणी सुरु होती. त्यादरम्यान, अतिरिक्त सरकारी वकील अरुणा पै यांनी सांगितले, की धर्मग्रंथ वाचणे आणि प्रार्थना करण्याच्या कारणावरून त्या मुलीचे काका-काकू चांगलेच संतापले होते. या संतापाच्या भरातच 4 मेला मुलीच्या काका आणि काकूने ओढणीच्या सहाय्याने तिचा गळा आवळून खून केला होता. मात्र, तत्पूर्वी मुलीच्या काका आणि काकूंनी त्या मुलीला खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी डॉक्टरांना त्यांनी मुलगी बाथरूममध्ये पडल्याचे सांगितले होते.

रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी संबंधित मुलीला मृत घोषित केले. त्यानंतर करण्यात आलेल्या शवविच्छेदनाच्या अहवालात मुलीची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी मुलीच्या काका आणि काकूसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Relatives kill 15 year­ old in Mumbai because she refused to read holy book