'ती' रक्कम ताळेबंदात धरण्याचे जिल्हा बँकांना आदेश 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 29 मार्च 2018

अमित शहांच्या बॅंकेचाही समावेश 
देशभरातील गुजरातसह तमिळनाडू, उत्तर प्रदेशमधील काही जिल्हा बॅंकांकडेही अशी रक्कम शिल्लक होती. त्यात गुजरातमधील अहमदाबाद जिल्हा बॅंकेकडे 14.99 कोटी शिल्लक होते. या बॅंकेवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्त्वाखालील सत्ता आहे. इतर बॅंकांकडील शिल्लक रक्कम अशी - (आकडे कोटींत) 
जिलमपूर, तमिळनाडू- 21.56, लखीमपूर, उत्तर प्रदेश-5.13, फरिदाबाद, उत्तर प्रदेश-1.47, उदयपूर, राजस्थान-0.02. 

कोल्हापूर : राज्यातील जिल्हा बॅंकांकडे नोटबंदीदिवशी (8 नोव्हेंबर 2016) शिल्लक असलेली रक्कम यावर्षीच्या ताळेबंदात "प्रोव्हिजन' म्हणून धरण्यात यावी, असा महत्त्वपूर्ण आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. या निर्णयाने कोल्हापूरसह पुणे, सांगली, नाशिक, नगर आदी जिल्हा बॅंकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी चलनातून त्या वेळच्या 500 व 1000 च्या नोटा रद्द केल्या. सुरवातीला या नोटा स्वीकारण्याचे अधिकार जिल्हा बॅंकांना दिले; पण राष्ट्रीयकृत्त बॅंकांच्या तुलनेत जिल्हा बॅंकांकडे मोठ्या प्रमाणात या नोटा जमा झाल्या. त्याचा संशय आल्याने रिझर्व्ह बॅंकेने जिल्हा बॅंकांना नोटा स्वीकारण्यास मनाई केली. ही रक्कम बॅंकेला तोटा झाल्याचे दाखवून ती ताळेबंदात धरण्याचे आदेश नाबार्डने 30 जानेवारी 2018 रोजी सर्वच जिल्हा बॅंकांना दिले होते. 

नाबार्डच्या या निर्णयाविरोधात कोल्हापूरसह पुणे, नाशिक, नगर, सांगली जिल्हा बॅंकाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयाचे न्या. ए. के. सिक्री व न्या. अशोक भूषण यांच्यासमोर झाली. बॅंकांचे वकील व नाबार्डचा युक्तिवाद ऐकून घेऊन न्यायालयाने ही रक्कम 31 मार्च 2018 च्या ताळेबंदात "प्रोव्हिजन' म्हणून धरण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर यासंदर्भात "नाबार्ड'ने दोन आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेशही दिले. 

या दाव्यात कोल्हापूर व नाशिक बॅंकेच्या वतीने कपिल सिब्बल, गोपाल सुब्रह्मण्यम, हरीन रावळ, शिवाजीराव जाधव यांनी, पुणे व नगर बॅंकेच्या वतीने पराग त्रिपाठी, आडसुरे यांनी तर रिझर्व्ह बॅंकेच्या वतीने नरसिंहा, नाबार्डच्या वतीने पी. के. जैन यांनी काम पाहिले. 

राज्यात 112 कोटी रुपयांना दिलासा 
राज्यातील काही ठराविक बॅंकांकडे 8 नोव्हेंबर रोजी 112 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा शिल्लक होत्या. राज्यातील बॅंकानिहाय शिल्लक रक्कम अशी- (आकडे कोटींत) 
कोल्हापूर - 25.27, सांगली - 14.72, नाशिक-21.60, नागपूर-5.03, पुणे- 22.27, अहमदनगर-11.69, वर्धा-0.78. 

अमित शहांच्या बॅंकेचाही समावेश 
देशभरातील गुजरातसह तमिळनाडू, उत्तर प्रदेशमधील काही जिल्हा बॅंकांकडेही अशी रक्कम शिल्लक होती. त्यात गुजरातमधील अहमदाबाद जिल्हा बॅंकेकडे 14.99 कोटी शिल्लक होते. या बॅंकेवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्त्वाखालील सत्ता आहे. इतर बॅंकांकडील शिल्लक रक्कम अशी - (आकडे कोटींत) 
जिलमपूर, तमिळनाडू- 21.56, लखीमपूर, उत्तर प्रदेश-5.13, फरिदाबाद, उत्तर प्रदेश-1.47, उदयपूर, राजस्थान-0.02. 

Web Title: Relief for PDCCB as Supreme Court stays NABARD circular