मोदींसाठी 'जेएनयू'चे नाव बदला : भाजप खासदार

वृत्तसंस्था
रविवार, 18 ऑगस्ट 2019

- दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (जेएनयू) नाव बदलावे

- विद्यापीठाला नवे नाव 'एमएनयू' द्यावे.

नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (जेएनयू) नाव बदलावे आणि 'एमएनयू' करावे, असे विधान भाजप खासदार हंसराज हंस यांनी केले आहे. तसेच आमच्या पूर्वजांनी काही चुका केल्या आणि त्या चुकांचा परिणाम आम्ही भोगत आहोत. मोदींच्या नावे काहीतरी असायला हवे, त्यामुळे जेएनयूचे नाव आता एमएनयू करायला हवे, असेही ते म्हणाले.

एएनआय या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे विधान केले. याबाबतचा व्हिडिओही जारी करण्यात आला आहे. हंसराज हंस म्हणाले, की आमच्या पूर्वजांनी काही चुका केल्या आहेत आणि त्यांच्या चुकांचा परिणाम आम्हाला भोगावा लागत आहे. मोदींच्या नावाने काहीतरी असायला हवे. पंतप्रधान मोदींनी अशक्य गोष्टी शक्य केल्या. त्यामुळेच तर म्हटले जाते, 'मोदी है तो मुमकिन है'

तसेच ते पुढे म्हणाले, मोदींनी जम्मू-काश्मीरातील कलम 370 हटविण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सर्वांना चांगला वाटला. त्यामुळे आता प्रार्थना करा, की सर्व लोक सुख-समाधानाने राहतील. जवान इथला मरू अथवा तिकडचा मरतो तर एकाच मातेचा पुत्र. मग नंतर त्यांना परमवीर चक्र मिळो अथवा धर्मवीर चक्र. मातेचे पुत्र परत कधीच येत नाही. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rename of JNU for Narendra Modi says BJP MP Hans Raj