
Republic Day 2023 : कर्तव्याची आठवण ठेवा; प्रजासत्ताक दिनी निसर्गविषयक ही कलम कायम लक्षात ठेवा
Republic Day 2023 : आपण सगळे जाणतोच की भारताची राज्यघटना संविधान समितीने २६ नोव्हेंबर इ.स. १९४९ रोजी स्वीकारली आणि ती २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी अंमलात आणली. २६ जानेवारी! भारतीय प्रजासत्ताक दिन! कर्तव्याची आठवण करून देणारा हा दिवस! राष्ट्राचं हित डोळ्यासमोर ठेवून जी घटना लिहिली त्यात ‘निसर्ग’ विषयक एक कलम आहे...
‘जंगले, उद्याने, नद्या आणि वन्यजीवन या सारख्या नैसर्गिक संपत्तीचे रक्षण करणे व ती वाढीस लावणे.’’ प्रत्येक नागरिकानं अंतर्मुख होऊन विचार केला तर आपणच आपल्याला काय उत्तर देऊ? नैसर्गिक संपत्तीचं आपण खरंच रक्षण करतो? नुसतंच रक्षण नाही; तर वाढीस लावायला पाहिजे, असं त्यात नमूद केलंय. केवढी मोठी जबाबदारी आहे आपल्यावर! प्रजासत्ताक दिनी याबाबत सविस्तर जाणून घ्या.
आपली भारतभूमी सुजलाम् सुफलाम्! भारतभूमी नद्यांनी किती किती समृद्ध! काही नद्या हिमालयाच्या कुशीत उगम पावलेल्या. त्या हिमपोषित नद्या. या नद्यांना भरभरून पाणी. अगदी वर्षभर! कारण उन्हाळ्यात बर्फ वितळून नदी खळाळत वहात रहाते. भारतीय सरिता कोशात वाचायला मिळालं की हिमालय निर्मितीपूर्वीही त्या ठिकाणी नद्या अस्तित्वात होत्या.
या नद्यांना ‘पूर्वकालीन नद्या’ म्हटलं आहे. हिमालय निर्माण होण्याच्या प्रक्रियेत अशा नद्यांचे प्रवाह मार्ग उचलले गेले. त्याचा परिणाम असा झाला की काही काळ या नद्यांची संगमापर्यंत वाहण्याची क्रिया थांबली आणि त्या मार्गामध्ये सरोवरं निर्माण झाली. मध्ये काही काळ गेला. सरोवरातून बाहेर पडणाऱ्या त्या नद्यांनी पुन्हा आपापला मार्ग शोधला. जी भूमी उंचावलेली होती ती भूमी कोरून काढून पूर्वीसारख्याच त्या संगमाच्या दिशेनं वाहू लागल्या. हिमालय निर्माण झाला, त्यानंतर पुन्हा त्या परिसरात नद्या वाहू लागल्या. त्या नद्यांना ‘उत्तरकालीन नद्या’ असं म्हटलेलं आहे.

हिमालयाच्या कुशीत उगम पावलेल्या या नद्या सोडल्या तर इतर सगळ्या नद्या पावसावर अवलंबून असलेल्या. पाऊस आहे तर या नद्यांना पाणी. अगदी दुथडी भरभरून वहातात त्या. उन्हाळा आला की त्या रोडावतात, सुकतात. आमच्या दक्षिण द्वीपकल्पातील नद्या बघा. दक्षिण द्वीपकल्पात ज्या नद्या उगम पावलेल्या आहेत त्यांनी डोंगरपठारातून आपला मार्ग कोरून काढला. उदा. कृष्णा, गोदावरी अशा काही नद्या!
काही नद्या भौगोलिक घडामोडीतून जन्माला आल्या आहेत. पृथ्वीच्या कवचामध्ये होणाऱ्या घडामोडीमुळे काही काही ठिकाणी भूपृष्ठाला घड्या पडल्या. काही ठिकाणी भूपृष्ठाचा एखादा भाग मध्येच खचला आणि खोरी निर्माण झाली. डोंगराच्या कुशीत उगम पावलेल्या नद्या दऱ्याखोऱ्यांमधून वाहू लागल्या.
नर्मदामैय्या अशी खोऱ्यातून वहाणारी. दक्षिण द्वीपकल्पातील नद्या हिमालयातल्या नद्यांपेक्षा अधिक प्राचीन आहेत, असं वाचनात आलं. नर्मदा आणि तापी या नद्यांचा अपवाद वगळता इथल्या नद्यांचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे त्या पूर्व दिशेकडे वाहतात. ती त्यांची मूळ प्रवृत्ती. पश्चिम समुद्र किनारपट्टीच्या पूर्वेला काही अंतरावर सह्याद्री पर्वताची म्हणजेच पश्चिम घाटाची रांग आहे. तिच्यातून निघणाऱ्या गोदावरी, कृष्णा, कावेरी अशा नद्या दूरवर प्रवास पूर्वेकडे समुद्राला जाऊन मिळतात. त्याच पश्चिम घाटातून निघणाऱ्या आणि पश्चिम सागराला जाणाऱ्याही काही नद्या आहेत; पण त्यांची संख्या कमी.
वेदामध्ये ‘आप’ ही एक वैदिक देवता आहे. ती आहे सर्व नद्यांची प्रातिनिधिक देवता. वेदात जल आणि नदी या दोन्ही अर्थानं ‘आप’ हा शब्द वापरलेला आहे. मानवी संस्कृती नदीकाठानंच बहरली. ऋषींनी वैदिक काळापासून नदीला देवता स्वरूपात पाहिलं. नदी देवतांनी धनधान्य, संपत्ती द्यावी, शत्रूपासून संरक्षण करावं, पुरानं नुकसान करू नये, अशा अनेक प्रार्थना ऋग्वेदात केल्या आहेत. वैदिक ऋषी, मुनी, साधुसंत, आचार्य अशा श्रेष्ठ व्यक्तींनी नदीकडे केवळ एक पाण्याचा प्रवाह अशा जडस्वरूपात न बघता तिला ईश्वरी तत्त्वाचा एक आविष्कार म्हणूनही पाहिलं आहे. असं आपण कधी पाहणार? आणि तिचं रक्षण करणार?
या नद्या अनादी ओंकार ध्वनीसारख्या भरून राहणाऱ्या वाटतात. पृथ्वीवर पंचमहाभूतं निर्माण झाली आणि तेव्हापासून आजतागायत प्रवाहित असलेला त्यांचा नाद! ते प्रवाही जळ! त्या जळातली ती अवीट गोडी, साऱ्या सृष्टीच्या कणाकणातून त्या थेंबाथेंबातून वहात आहेत. त्या जळाच्या स्पर्शानं सर्वांग रोमांचित आणि प्रसन्न होतं.
हेही वाचा: Republic Day 2023 : बारा वेळा पुरस्कार अन् बरंच काही, महाराष्ट्राच्या चित्ररथांचा रंजक इतिहास
नद्यांची ओळख वाढत जाते तसे तिच्यातले बारकावे उमगत जातात. वळणं वळणं घेत जाणाऱ्या या नद्या कडेकपारीतून, दऱ्याखोऱ्यातून, विविध प्रकारच्या भूमीला समृद्ध करत सर्वांसाठीच आनंद विश्व निर्माण करतात. कालचक्र फिरत आहे... काळाच्या ओघात या नद्या औद्योगीकरणाला, नको नको त्या रसायनांना बळी पडलेल्या आहेत. अनेक कारणांनी सगळीकडे वाढत जाणारं प्रदूषण पाहून मन खट्टू होतं. लहानपणापासून जिच्या पाण्यात खेळलो, जिच्या पाण्यावर मोठे झालो तिची अवस्था पाहून मन कासाविस होतं. खचून जातं. (Republic Day)
त्या पवित्र, शुद्ध नद्यांचं रूप नाहीसं झालं आहे. असं असलं तरी नवा विचार प्रवाह समोर येत आहे. पाणी प्रदूषित होऊ नये म्हणून लोक जागे होताहेत. पूर्वीचा नद्यांचा तो निर्मळ गंध, ते नितळ निळंसावळं रूप डोळ्यासमोर उभा राहतं. मनाची तार नकळतपणे झंकारते. आणि वाटतं, संविधानातील कलमाप्रमाणे नद्यांचं रक्षण होऊन पुन्हा त्या वाढीस लागतील का? पूर्ववत होऊन वहातील का?