‘आरक्षणामुळे दहा टक्के मते वाढतील’

पीटीआय
सोमवार, 21 जानेवारी 2019

लोकसभा निवडणुकीला अद्याप काही महिने बाकी आहेत. सरकार एकामागून एक बाण सोडणार आहे. विरोधकांच्या आघाडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल, यावर जनतेचा कल मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. जनता मोदींचे खंबीर नेतृत्वच स्वीकारेल.
- रामविलास पासवान, केंद्रीय मंत्री

नवी दिल्ली -आर्थिक दुर्बळ असलेल्या सवर्णांना दहा टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयामुळे भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या मतांमध्ये दहा टक्के वाढ होईल, असा विश्‍वास केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी आज व्यक्त केला. 

आरक्षणामुळे पुन्हा पंतप्रधानपदावर येण्याचा नरेंद्र मोदी यांचा मार्ग प्रशस्त झाल्याचे ‘एनडीए’मधील लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष असलेल्या पासवान यांनी ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. ‘लोकानुनय करणाऱ्या योजना राबविण्याऐवजी विकास घडवून आणणाऱ्या दीर्घकालीन योजनांवर मोदी सरकारचा भर आहे. यामुळे काही वेळा लोक नाराज होत असले तरी ते मोदींच्या बळकट आणि स्थिर नेतृत्वालाच मतदान करतील. याउलट, परस्पर वाद आणि अस्थैर्याच्या पायावरील विरोधकांच्या महाआघाडीला जनता साफ झुगारून टाकेल,’ असा दावा पासवान यांनी केला.  

पासवान म्हणाले, की सवर्ण आरक्षणामुळे ‘एनडीए’च्या मतांमध्ये दहा टक्के वाढ होईल. या आरक्षणाला विरोध केल्यामुळे बिहारमध्ये लालूप्रसाद यांच्या ‘राजद’ला खाते उघडणेही अवघड जाणार आहे. उत्तर प्रदेशातही ‘एनडीए’ला ७० हून अधिक जागा मिळतील. दलितांचा ओढा कोणाकडे असेल, असे पासवान यांना विचारले असता त्यांनी मोदींचेच नाव घेतले. मोदी आपल्यासाठी काम करत असल्याचे, योजना आणत असल्याचे दलितांनी पाहिले असल्याचे पासवान यांनी सांगितले. 

लोकसभा निवडणुकीला अद्याप काही महिने बाकी आहेत. सरकार एकामागून एक बाण सोडणार आहे. विरोधकांच्या आघाडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल, यावर जनतेचा कल मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. जनता मोदींचे खंबीर नेतृत्वच स्वीकारेल.
- रामविलास पासवान, केंद्रीय मंत्री

Web Title: Reservation will increase ten percent votes