esakal | Delhi : नवज्योतसिंग सिद्धूंच्या शंकांचे निरसन
sakal

बोलून बातमी शोधा

delhi

नवज्योतसिंग सिद्धूंच्या शंकांचे निरसन

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली / चंडीगड : काँग्रेसमधील अंतर्गत संघर्षात वरिष्ठ नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने नव्या वादाला तोंड फुटले होते. सिद्धू हे काँग्रेसही सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. या वादाच्या पार्श्वभूमीवर सिद्धू यांनी आज मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांची भेट घेतली.

या बैठकीत सिद्धू यांनी घेतलेल्या आक्षेपांवर समाधानकारक तोडगा काढण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीपूर्वी माध्यमांशी बोलताना सिद्धू यांनी आपण कोणत्याही मुद्यावर चर्चा करायला तयार आहोत असे सांगितले होते. सिद्धू यांनी आज पंजाब भवनमध्ये मुख्यमंत्र्यांशी भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. या भेटीपूर्वी सिद्धू यांनी राज्याच्या नव्या पोलिस महासंचालकांवर टीका केली. या महासंचालकांनी दोन शीख तरुणांना चुकीच्या प्रकरणामध्ये गोवले होते तसेच बादल यांनाही क्लिनचिट दिली होती असे सिद्धू यांनी म्हटले आहे.

आज मुख्यमंत्री चन्नी यांची भेट घेण्यासाठी सिद्धू हे पतियाळातून चंडीगडमध्ये दाखल झाले होते. याआधी चन्नी यांनी सिद्धूंची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता. पक्ष घेईल तो निर्णय सर्वांनाच मान्य असेल असे त्यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे सुनील जाखड यांनी नाराजी व्यक्त केली असून राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या अधिकाराचे जे हनन होते आहे ते प्रयत्न आपण सर्वांनी हाणून पाडले पाहिजे असे मत मांडले.

पक्षात गोंधळाचे वातावरण

पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी मुख्यमंत्रिपदाचा दिलेला राजीनामा, मुख्यमंत्रिपदी दलित चेहरा म्हणून चरणजितसिंग चन्नी यांची झालेली निवड आणि या पदासाठी आस लावून बसलेले नवज्योतसिंग सिद्धू यांनी राजकीय भवितव्याच्या अस्थिरतेतून थेट प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने काँग्रेसमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता पक्षातच जुने आणि नवे असा संघर्ष सुरू झाला आहे.

नेतृत्वावर प्रश्‍नचिन्ह

भाजपमधून आलेल्या नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर राहुल गांधी आणि प्रियांका गांधींचा असलेला अतिविश्वास, त्यातूनच कॅप्टन अमरिंदरसिंग यांना हटविण्याचा झालेला निर्णय आणि या निर्णयाला मूक संमती देत पुढे सोनिया गांधींनी हतबलता व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर सिद्धूंनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने राहुल आणि प्रियांकांच्या निर्णय क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. यामुळेच काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावण्याचीही मागणी सुरू झाली आहे.

loading image
go to top