निकालांमध्ये नव्या भारताचा पाया दिसतोय : पंतप्रधान

वृत्तसंस्था
रविवार, 12 मार्च 2017

नवी दिल्ली - पाच राज्यांच्या निवडणूक निकालांमध्ये नव्या भारताचा पाया दिसत असल्याचे सांगून जनतेच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांपुढे बोलताना सोडला. ज्यांनी भाजपला मत दिले नाही, त्यांच्याशी भेदभाव केला जाणार नाही, असेही ते म्हणाले.

नवी दिल्ली - पाच राज्यांच्या निवडणूक निकालांमध्ये नव्या भारताचा पाया दिसत असल्याचे सांगून जनतेच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांपुढे बोलताना सोडला. ज्यांनी भाजपला मत दिले नाही, त्यांच्याशी भेदभाव केला जाणार नाही, असेही ते म्हणाले.

उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पंजाब वगळता भाजपला मिळालेल्या अभूतपूर्व यशाबाबत मोदी यांचा भाजप कार्यालयात सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. पंतप्रधान मोदी म्हणाले, की पाच राज्यांमधील जनादेशात आपल्याला नव्या भारताचा पाया दिसत आहे. या नव्या भारतात 35 वर्षांपर्यंत वय असलेल्या युवक, तसेच महिलांच्या इच्छा, आकाक्षांचे प्रतिबिंब दिसत आहे. या नव्या भारतातील गरिबाला सरकारकडून काही मिळण्याची अपेक्षा नाही; तर संधी मिळाल्यास आपल्या मेहनतीच्या बळावर पुढे जाण्याची ताकद त्यात दिसते आहे. त्यामुळेच सरकारचा प्रमुख म्हणून यापुढे गरिबांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यावर भर राहील. समाजातील गरीब माणूस हा या देशाची खरी शक्ती आहे. म्हणूनच देशातील गरिबांची स्थिती जशी सुधारेल तसा देशातील मध्यमवर्गावर असलेला भार कमी होईल, असा दावा त्यांनी केला.

उत्तर प्रदेशात मिळालेला अकल्पनीय विजय राजकीय भाष्यकार आणि "पोल पंडितां'ना विचार करायला लावणारा आहे. त्याचप्रमाणे कुठलाही भावनिक मुद्दा नसताना मतदानाची वाढलेली टक्केवारी लोकशाहीसाठी एक शुभसंकेत आहे. याचाही विश्‍लेषकांना विचार करावा लागणार आहे, असे मोदी म्हणाले.

गेल्या पन्नास वर्षांपासून विकासाचा मुद्दा घेऊन जायला राजकीय पक्ष घाबरायचे. मात्र, भाजपने हा मुद्दा प्रभावीपणे मांडल्याने जनतेने त्याला भरभरून कौल दिल्याचे ते पुढे म्हणाले. उत्तर प्रदेशातील निवडणूक भाजपसाठी एक भावनिक मुद्दा आहे. उत्तर प्रदेश ही अंत्योदयासाठी झटणारे पंडित दीनदयाल उपाध्याय यांची कर्मभूमी होती. त्यांच्या कर्मभूमीत भाजपला गरिबांसाठी काम करण्याचा जनादेश मिळाला असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

विनम्र राहा
भाजपच्या वटवृक्षाला विजयाची फळे लागत असल्याने फळांनी लगडलेले झाड ज्याप्रमाणे झुकते त्याप्रमाणे विनम्रपणे झुकण्याची सर्वांची जबाबदारी आहे. या विजयाकडे सेवा करण्याची संधी म्हणून पाहा, असे आवाहन त्यांनी उपस्थित नेते, कार्यकर्त्यांना केले. पंतप्रधानांच्या अर्ध्या तासाच्या भाषणात वेळोवेळी कार्यकर्त्यांकडून "मोदी, मोदी' अशा घोषणा दिल्या जात होत्या.

Web Title: Results shows the new india : PM