परूळे चिपी विमानतळाचा प्रभू यांच्याकडून आढावा 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 28 जुलै 2018

रत्नागिरी विमानतळाच्या जागेच्या प्रश्‍नावर मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी व्यक्तिशः बोलणार आहे, असेही प्रभू यांनी सांगितले. राज्यात सध्या तीन आंतरराष्ट्रीय व 13 देशांतर्गत विमानतळ आहेत.

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी भागासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या सिंधुदुर्गातील परूळे चिपी येथील ग्रीन फील्ड विमानतळाच्या कामाचा नागरी विमान वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांनी नुकताच आढावा घेतला. रत्नागिरी विमानतळाच्या कामावर जमीन संपादनातील अडचणींमुळे अडचणी येत असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. त्यावर महाराष्ट्र सरकारबरोबर चर्चा करण्याच्या सूचना प्रभू यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

रत्नागिरी विमानतळाच्या जागेच्या प्रश्‍नावर मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी व्यक्तिशः बोलणार आहे, असेही प्रभू यांनी सांगितले. राज्यात सध्या तीन आंतरराष्ट्रीय व 13 देशांतर्गत विमानतळ आहेत. सिंधुदुर्गाचे काम पूर्ण झाल्यावर महाराष्ट्रातील देशांतर्गत विमानतळांची संख्या 14 होणार आहे. 
केंद्र सरकारच्या "उडान' (उडे देश का आम आदमी) या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग विमानतळाचे काम जवळपास पूर्णत्वास आल्याची माहिती प्रभू यांना देण्यात आली.

सिंधुदुर्ग विमानतळाच्या निर्मितीसाठी 520 कोटी रुपये खर्च येणार आहे. विमानतळाच्या परिसरातील टॅक्‍सी मार्गिकेसह वाहनांसाठीची मार्गिका; तसेच अन्य कामे पूर्ण झाली असून, विद्युतीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे व प्रवासी टर्मिनसच्या इमारतीचे 80 टक्‍के काम पूर्ण झाले आहे; तसेच विमानतळाचा एटीसी मनोरा व तांत्रिक कक्षाचीही कामे पूर्ण झाली असून उर्वरित पूरक कामे आगामी महिनाभरात पूर्ण होतील, असा विश्‍वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

सिंधुदुर्ग विमानतळावर 2500 मीटरची धावपट्टी बनविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे भविष्यकाळात या धावपट्टीची लांबी वाढविण्याचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. 
 

राज्यात सध्या... 

03 
आंतरराष्ट्रीय विमानतळ 

13 
देशांतर्गत विमानतळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Review by Suresh Prabhu of Parule Chipi Airport